मुदतीपूर्वीच प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश

सुशांत मोरे
मंगळवार, 9 मे 2017

रेल्वे बोर्ड सदस्यांकडून "एमआरव्हीसी' फैलावर

रेल्वे बोर्ड सदस्यांकडून "एमआरव्हीसी' फैलावर
मुंबई - उपनगरी लोकल मार्गावर काही वर्षांपासून "एमआरव्हीसी'तर्फे (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत; काही नव्याने सुरू होणार आहेत. हे प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करा आणि नव्याने मुदत देऊ नका, असे आदेश रेल्वे बोर्ड सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद यांनी दिले. यासंदर्भात त्यांनी "एमआरव्हीसी'च्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. प्रकल्पांची कामे रखडता कामा नयेत, असेही त्यांनी बजावले.

एमआरव्हीसीतर्फे "एमयूटीपी 2' अंतर्गत तीन - चार वर्षांपासून काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यात सीएसटी ते कुर्ला पाचवा, सहावा मार्ग, ठाणे ते दिवा पाचवा व सहावा मार्ग, अंधेरी ते गोरेगाव हार्बर मार्गाचा विस्तार, बोरिवली ते मुंबई सेंट्रल सहावा मार्ग, परळ टर्मिनस अशी काही महत्त्वपूर्ण प्रकल्प यात आहेत. ती पूर्ण करण्यासाठी नव्याने मुदतवाढ देण्यात आली. सीएसटी ते कुर्ला पाचवा व सहावा आणि ठाणे ते दिवा पाचवा व सहावा मार्ग हे 2019 पर्यंत पूर्ण केले जातील. या कामात परळ टर्मिनसही आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्याकरता आणखी दोन वर्षे लागतील. परळ टर्मिनसच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

अंधेरी ते गोरेगाव हार्बर मार्ग विस्ताराचे काम एप्रिल 2017 पर्यंत पूर्ण होणार होते. हे काम पूर्ण करण्यासाठी आता डिसेंबर 2017 चा नवीन मुहूर्त ठरवण्यात आला आहे. बोरिवली ते मुंबई सेंट्रल सहावा मार्गही रखडला आहे. तो पूर्ण करण्यासाठी मार्च 2021 पर्यंत मुदत देण्यात आली. एमयूटीपी 3 अंतर्गतही नवीन प्रकल्पांची कामे सुरू केली जातील. यात विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरीकरण, ऐरोली ते कळवा लिंक रोड हे प्रकल्प आहेत. त्यांच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. या सर्व कामांचा आढावा मोहम्मद जमशेद यांनी घेतला. हे प्रकल्प लवकर आणि वेळेत पूर्ण करा, अशी सूचना त्यांनी एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांना केली. एमयूटीपी 2 अंतर्गत प्रकल्पांची कामे अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्यातील जुने आणि नवे प्रकल्प हे मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यावर भर द्या, असे सांगून सुरू असलेल्या कामांबाबत जमशेद यांनी नाराजी व्यक्‍त केली.

"सायक्‍लिक'च्या अभ्यासाचा सल्ला
मुंबई उपनगरी लोकल मार्गावर नव्या सायक्‍लिक (चक्रीय) वेळापत्रकाचा अभ्यास करण्यात यावा, अशी सूचना जमशेद यांनी पश्‍चिम रेल्वेला केली. या वेळापत्रकानुसार ठराविक वेळेत एकाच स्थानकासाठी लोकल सुटतील आणि त्यामुळे लोकलमधील गर्दीचा प्रश्‍न सुटू शकतो. यात लहान अंतराऐवजी लांबच्या फेऱ्या चालवण्यावर अधिक भर असेल; मात्र हे वेळापत्रक पश्‍चिम रेल्वेने नाकारले होते. मात्र जमशेद यांनी त्याचा पुन्हा अभ्यास करण्यास सुचवले आहे.

Web Title: The order to complete the project before the deadline