मेहेर नाकारणाऱ्या पत्नीला पुन्हा मेहेर देण्याचे आदेश

File Photo
File Photo

मुंबई : निकाह करून दुसरी पत्नी झाल्यावर मेहेर (पोटगी)चा हक्क परत करणाऱ्या महिलेला पुन्हा मेहेर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पतीला दिले आहेत. पत्नीने स्वेच्छेने मेहेर परत केल्यामुळे तिला मेहेर नको हा पतीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला.

एकदा सोडून दिलेली ५० लाख रुपयांची मेहेर परत मिळण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या पत्नीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका केली होती. या महिलेचा वहाब (नाव बदलले आहे) यांच्याशी २०१६ मध्ये निकाह झाला होता. या निकाहापूर्वी वहाब यांचा पहिला निकाह झालेला होता. दुसऱ्या निकाहात त्यांनी मेहेरचे ५० लाख रुपये लेखी निश्‍चित केले होते. ही रक्कम मालमत्तेच्या स्वरूपात पत्नीला देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. वहाब यांचे दोन मजली घर मेहेर म्हणून देण्याचे मान्य करण्यात आले होते. निकाहानंतर सर्व काही सुरळीत होते. त्यांना एक मुलगाही झाला.

यादरम्यान पत्नीने मेहेरची रक्कम घेणार नाही असे लेखी दिले; मात्र त्यानंतर दोघांत खटके उडू लागले. घरात सन्मानाने वागणूक मिळत नाही असे कारण देत याचिकादार महिला माहेरी आई-वडिलांकडे निघून गेली. त्यानंतर तिने मेहेरची मागणी करणारी नोटीस पतीला वकिलामार्फत बजावली; मात्र पतीने याची दखल घेतली नाही. त्यामुळे कुटुंब न्यायालयात याबाबत दावा दाखल करण्यात आला; मात्र पत्नीने यापूर्वी मेहेरचा हक्क लेखी स्वरूपात नाकारल्यामुळे तिला पुन्हा मेहेरची रक्कम कायद्याने देता येत नाही, असा दावा पतीच्या वतीने करण्यात आला.

कनिष्ठ न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानत पत्नीला मेहेर देण्यास नकार दिला. याविरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्या. झेड. ए. हक आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली.

पत्नी मागेल तेव्हा मेहेर देण्याची तरतूद
मेहेर नाकारण्याचे पत्र दबावाखाली दिले होते असे पत्नीच्या वतीने सांगण्यात आले. तसेच मेहेर ही पतीने देण्याची रक्कम आहे आणि पत्नी जेव्हा मागेल तेव्हा द्यायला हवी, अशी तरतूद संबंधित कायद्यात आहे, असा युक्तिवादही या वेळी करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला. कुटुंब न्यायालयाने याबाबतच्या कायदेशीर बाबी पडताळायला हव्या होत्या, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि पतीने पत्नीला मेहेरची रक्कम द्यावी असे आदेश दिले.

Order to give Meher back to wife who refuses Meher

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com