अवयव प्रत्यारोपणाची लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे

नेत्वा धुरी
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून राज्यात लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर चार राज्ये आणि दीव व दमण या केंद्रशासित प्रदेशांतील अवयव प्रत्यारोपणाचे काम पाहणाऱ्या रिजनल ऑर्गन एंड टिश्‍यू ट्रान्सप्लांट कमिटी (रॉटो)ने हे काम हाती घेतले आहे.

मुंबई - अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून राज्यात लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर चार राज्ये आणि दीव व दमण या केंद्रशासित प्रदेशांतील अवयव प्रत्यारोपणाचे काम पाहणाऱ्या रिजनल ऑर्गन एंड टिश्‍यू ट्रान्सप्लांट कमिटी (रॉटो)ने हे काम हाती घेतले आहे.

परळ येथील केईएम रुग्णालयातील रोटोच्या कार्यालयात याबाबत आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. राज्यातील सर्व भागात समान मार्गदर्शक पद्धत असावी, या हेतूने काही आंतरराष्ट्रीय पद्धती राबवण्याचाही विचार सुरू आहे. एकसमान मार्गदर्शन पद्धतींच्या अवलंबनाने अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, या हेतूने नवे बदल होत असल्याची माहिती रॉटो संस्थेच्या संचालिका डॉ. ए. गट्टीवाला यांनी दिली. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या चार प्रमुख विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या (झेडटीसीसी) आहेत. पहिल्यांदा मुंबईतील झेडटीसीसी संस्थेची स्थापना झाली. त्यामुळे त्यानंतर स्थापन झालेल्या औरंगाबाद आणि नागपूर येथील झेडटीसीसीने मुंबईने सुरू केलेली मार्गदर्शन तत्त्वे स्वीकारली. पुण्याने स्वतःची मार्गदर्शन तत्त्वे तयार केली. यामुळे कामात अडथळा आला नसला तरीही राज्यभरात एक समान पद्धती असावी, असा विचार सुरू होता. त्यानुसार आता काम सुरू झाल्याचे डॉ. गट्टीवाला म्हणाल्या. या मार्गदर्शक तत्त्वांवर आरोग्य विभागाने मंजुरी दिल्यानंतर अंमलबजावणीस सुरवात होईल, असे त्या म्हणाल्या.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संभाव्य बदल
रुग्णांची नोंद, कोणत्या रुग्णाला प्रत्यारोपण शक्‍य आहे, मेंदू मृत रुग्ण कसा जाहीर करायचा, प्रत्यारोपणापूर्वी आवश्‍यक तपासण्या, अवयवांची वितरण प्रक्रिया इत्यादी.

प्रत्येक राज्यानुसार नवी मार्गदर्शक तत्त्वे आणण्याची मुभा आहे. त्यानुसारच राज्याला नवी मार्गदर्शक तत्त्वे मिळत आहेत. ही मंजूर झाली की रॉटोअंतर्गत येणारी गुजरात, गोवा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि दीव व दमण या केंद्रशासित प्रदेशांतही ही तत्त्वे अमलात येतील.
- डॉ. ए. गट्टीवाला, संचालिका, रॉटो

Web Title: Organ transplantation New guidelines