'...अन्यथा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू'; रस्ते दुरवस्थेवरून शिवसेना खासदार आक्रमक

राहुल क्षीरसागर | Sunday, 15 November 2020

ठाण्यातील घोडबंदर परिसरात नागरीकरण वाढल्याने वाहनांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे.

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर परिसरात नागरीकरण वाढल्याने वाहनांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. या भागात नादुरुस्त रस्त्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा अपघातास कारणीभूत ठरल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. 

हेही वाचा - जोगेश्‍वरीच्या ट्रामा केअरमधील शिशू अतिदक्षता विभाग सुरू होणार; डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याचा BMCचा निर्णय 

घोडबंदर भागातील नागरिकांना मुंबईकडे नोकरीनिमित्त, तसेच खरेदीसाठी ठाणे शहराकडे ये-जा करावी लागते. या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच कोपरी पुलाचे सुरू असलेल्या कामामुळे ठाण्यामध्ये प्रवेश करताना तासन्‌तास कोंडीत अडकावे लागते; तर मेट्रोच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. खासदार राजन विचारे यांनी पालिकेच्या रखडलेल्या सर्व्हिस रोडची वन खाते व महापालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून यामधील तिढा सोडवला. यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी एसएसआरडीसीकडून रस्त्यांची दुरुस्ती व्यविस्थतरित्या केली जात नसल्याची बाब विचारे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. 

हेही वाचा - कोरोना संकटामुळे सुटीवर असलेले 55 वर्षांवरील पोलिस सेवेत रुजू

विचारे यांनी गुरुवारी (ता. 12) रात्री उशिरा एसआरडीसी, एमएमआरडीए, तसेच आयआरबी टोलचे व्यवस्थापक यांच्यासोबत रस्त्यांची पाहणी केली. यावेळी वारंवार वाहतूक शाखेकडून सांगूनही एमएसआरडीसी अधिकाऱ्यांकडून रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने विचारे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता शशिकांत सोनटक्के यांना पत्र देऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरील साईड पट्टी खराब झाल्याने खड्डे तयार झाले आहेत. योग्यरित्या डागडुजी होत नसल्याने या ठिकाणी अपघाती मृत्यूची संख्या वाढत आहे. येथे तत्काळ दखल घेऊन हे लवकरात लवकर काम मार्गी लावावे. तसे न केल्यास अपघाती मृत्यूमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनीही तत्काळ वरिष्ठांशी बोलून ही कामे येत्या 15 दिवसांत पूर्ण करू, असे आश्‍वासन दिले. 

otherwise we will file a case Shiv Sena MP is aggressive due to poor condition of roads

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )