भिवंडी पालिकेची कोट्यवधींची थकबाकी माफ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

स्टेम प्राधिकरणाने भिवंडी पालिकेची १११ कोटींची थकबाकी माफ केली असून, पालिकेला स्टेमला ४३ कोटींची थकबाकी अदा करावी लागणार आहे. 

भिवंडी : भिवंडी महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम पाणी पुरवठादार कंपनी आणि महापालिका यांच्यात थकीत पाणीपट्टी आणि भिवंडी पालिकेचा मालमत्ता कर यावरून पाच वर्षांपासून वाद सुरू होता. अखेर या वादावर समझोता होऊन तोडगा काढण्यात भिवंडी महापालिकेला यश आले आहे. स्टेम प्राधिकरणाने पालिकेची १११ कोटींची थकबाकी माफ केली असून, पालिकेला स्टेमला ४३ कोटींची थकबाकी अदा करावी लागणार आहे. 

स्टेमची प्राधिकरणाची महापालिकेवर पाणीपट्टीची थकबाकी ११४ कोटी २२ लाख; तर त्या रकमेवर ४० कोटी ७७ लाखांचे व्याज, अशी एकूण १५४ कोटी ८७ लाखांची थकबाकी होती. तसेच लवादाची १६ कोटी ७१ लाख व विलंब आकार १८ कोटी ५० लाख आणि पाणी देयकाची दीडपट जादा रक्कम एक कोटी ६५ लाख, अशी एकूण ३८ कोटी रुपयांची अतिरिक्त बाकी होती. तर भिवंडी महापालिकेची स्टेम प्राधिकरणावर मालमत्ता करापोटी सहा कोटी ४१ लाख आणि त्याचे व्याज ६७ कोटी ७६ लाख, अशी एकूण ७४ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी होती. या करवसुलीसाठी अनेक वर्षांपासून दोन्ही संस्थांचा एकमेकांकडे पत्रव्यवहार सुरू होता. 

ऐतिहासिक निर्णय
राज्य सरकारकडून भिवंडी पालिकेला जीएसटीपोटी दरमहा २० कोटींचे अनुदान अदा येते. ही रक्कम प्राप्त झाल्यानंतरच पालिकेने एक कोटी स्टेमला द्यावयाचे आहेत. हा निर्णय ऐतिहासिक असून, महापौर जावेद दळवी, आयुक्त अशोककुमार रणखांब व पालिका प्रशासनाने योग्य बाजू मांडल्यानेच यश प्राप्त झाले आहे.त्यामुळेच तब्बल १११ कोटींची बचत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outstanding waiver worth millions of Bhiwandi Corporation