मुंबईतील नाले कचऱ्याने ओव्हरफ्लो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होत नसल्याने दर वर्षी मुंबईत विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नागरिक स्वत: पुढाकार घेऊन महापालिकेकडे नालेसफाई करण्याची मागणी करत असतात. पण याकडेही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

मुंबई - पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होत नसल्याने दर वर्षी मुंबईत विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नागरिक स्वत: पुढाकार घेऊन महापालिकेकडे नालेसफाई करण्याची मागणी करत असतात. पण याकडेही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरातील तुंबलेल्या नाल्यामुळे आसपासच्या वसाहतींत पाणी शिरण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नालेसफाई करण्यात यावी; अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काही ठिकाणी नागरिकांनी दिला आहे. तर काही ठिकाणी नालेसफाईसाठी पालिका कार्यालयात नागरिकांकडून वारंवार निवेदन देण्यात येत आहे. 

वडाळ्यात दुर्लक्ष
वडाळा (बातमीदार) : कोरबा मिठागर परिसरात १० हजारहून अधिक लोकवस्ती आहे. लोकवस्तीच्या तुलनेत कचराकुंड्यांचा अभाव असल्याने येथील रहिवासी कचरा थेट नाल्यातच टाकतात. पालिकेने नालेसफाई केली तरी नाल्यातील कचऱ्यात रोजच वाढ होते. नाल्यातील गाळ साफ करण्यासाठी पालिकेचे अधिकारी वेळेवर येत नसल्याने कचऱ्याला प्रचंड दुर्गंधी येते. नाल्यातील वाढत्या कचऱ्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. आदर्श रमाई नगर नाला आणि कोरबा मिठागर नाला या दोन मोठ्या नाल्यांना जोडलेले रमामाता वाडी, नानाभाई वाडी, काळे वाडी, लक्ष्मण वाडी, नानूर वाडी नाला या पाच छोट्या नाल्यांची पूर्णपणे साफसफाई करण्याची मागणी येथील नागरिक वारंवार करतात. तरीही पालिका याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने नाल्याची स्वच्छता वेळेत केली नाही तर नाल्यालगतच्या वस्तींमध्ये पावसात पाणी शिरण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नाल्यांची साफसफाई करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले आहेत. त्यानुसार विभागातील नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. नाल्यातून काढलेला गाळ सुकल्यानंतर कर्मचारी त्वरित त्या ठिकाणावरून उचलून योग्य त्या ठिकाणी त्या गाळाची विल्हेवाट लावतील.
- लक्ष्मण व्हटकर, उपायुक्त (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) 

खार रेल्वे वसाहतीतील भूमिगत नाले गाळात
खार रोड - पावसाळा काही दिवसांवर आला असता खार, वांद्रे टर्मिनस आणि रेल्वे परिसरातील नाले सद्यःस्थितीत गाळाने भरलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली नाही, तर विभागात पाणी साचून रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली नाही तर रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खार व वांद्रेमधील जे. पी. रोड नाला, टोपीवाला नाला व पर्जन्य जलवाहिन्या रेल्वे वसाहतीतून भूमिगत गटारे जातात. वांद्रे पश्‍चिम रेल्वे वसाहतीतून वांद्रे टर्मिनस मार्गे चामडावाडी नाल्याला येऊन मिळणारे नाले सध्याच्या स्थितीत गाळाने भरलेले आहेत. नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. नाले साफ झाले नाही, तर विभागात पावसाचे पाणी साचण्याची भीती स्थानिक रहिवाशी करत आहेत. नालेसफाई संदर्भात पश्‍चिम रेल्वेचे अभियंता एस. के. मिश्रा यांना विचारले असता, त्यांनी वांद्रे टर्मिनस विभागातील नाले साफ करण्यास सुरुवात केली आहे. 

‘दिंडोशीत पाणी तुंबल्यास अधिकारीच जबाबदार’
गोरेगाव - पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होत नसल्याने दर वर्षी दिंडोशीतील सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळित होते. त्यामुळे या विभागातील नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा व इतर अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करा. यावर्षी दिंडोशीत पाणी तुंबल्यास पालिका अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा आमदार सुनील प्रभू यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला. 

आमदार सुनील प्रभू, स्थापत्य समिती अध्यक्ष तुळशीराम शिंदे, विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, नगरसेविका विनया सावंत, नगरसेवक आत्माराम चाचे यांच्यासह दिंडोशीतील नाल्यांची  पाहणी केली. पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे पाणी दिंडोशीतील आप्पा पाडा, कुरार व्हिलेजसारख्या सखल भागात साचत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबते. या भागातील नाल्यांची सफाई वेळेत होत नसल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याची बाब निदर्शनास आणत प्रभू यांनी नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले. 

Web Title: Overflow of drainage drains in Mumbai