ट्रान्सहार्बर विस्कळित ऐरोलीजवळ ओव्हरहेड वायर तुटली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

दिघा येथे ओव्हरहेड वायर तुटल्यानंतर आमच्या विभागाचे पथक तातडीने दुरुस्ती कामासाठी रवाना झाले. ठाण्याकडे जाताना तीन वळणे असल्याने मोटरमन गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी अशा घटना घडतात. याबाबतचा अहवाल तांत्रिक विभागाकडे पाठवला जाणार आहे. 

- विजय मुदलियार, कनिष्ठ अभियंता, ट्रान्स हार्बर मार्ग. 

तुर्भे : उपनगरी रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर कधी ओव्हरहेड वायर तुटल्याने; तर कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सेवा कोलमडल्याचे प्रकार अधूनमधून घडत आहेत. शनिवारीही सकाळी 11.30 च्या सुमारास ऐरोली ते ठाणे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. 

ऐरोली स्थानकातून ठाण्याला निघालेली लोकल प्रस्तावित दिघा रेल्वे मार्गानजीकच्या वळणावर आली असता ओव्हरहेड वायर तुटली. या प्रकारामुळे लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी लोकलमधून उड्या मारून ठाणे-बेलापूर मार्गावरून बस वा अन्य वाहनांचा आधार घेत ठाण्याच्या दिशेने प्रवास केला. काहींनी तर रुळावरच पायीवारी सुरू केली. घटनेनंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने धाव घेऊन दुरुस्ती काम सुरू केले. या गोंधळामुळे वाशी-पनवेलकडे जाणाऱ्या लोकलही अर्धा तास उशिराने धावत होत्या. 

प्रशासनाविरोधात प्रवाशांचा संताप 

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. ट्रान्स हार्बर मार्गावरील अंतर हे मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गापेक्षा कमी आहे, परंतु रेल्वे प्रशासनाकडून या मार्गाची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्याने मागील वर्षभरात ट्रान्सहार्बरची सेवा खोळंबण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्‍त केली. प्रशासनाला प्रवाशांच्या भावना कधी कळणार, असा सवाल या मार्गावरील शशांक पाटील यांनी केला. 

 

Web Title: Overhead wire broke off near Transenhar disrupted airoli