मुंबई : महिलेच्या हृदयात बसवले ८ लाखांचे पेसमेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pacemaker

मुंबई : महिलेच्या हृदयात बसवले ८ लाखांचे पेसमेकर

मुंबई - केईएम रुग्णालयात हृदयाची (Heart) समस्या जाणवणाऱ्या मुंबईतील ६२ वर्षीय तिल्लूपमा या महिलेच्या हृदयात तब्बल ८ लाखांचे पेसमेकर (Heart Pacemaker) बसवण्यात आले. पालिका रुग्णालयात पहिल्यांदाच इतके महागडे पेसमेकर बसवले गेले. यापूर्वी बसवलेल्या पेसमेकरला जंतुसंसर्ग झाल्याने पुन्हा एकदा नवे पेसमेकर या महिलेला बसवण्यात आले आहे.

२०१२ मध्ये या महिलेच्या हृदयाचे ठोके एकदम घटले होते. त्यामुळे चक्कर येणे, बेशुद्ध होणे अशा समस्या जाणवत होत्या. तेव्हा केईएममध्ये दाखल झाल्यावर ईसीजीनंतर हृदयाचे ठोके घटल्याचा निष्कर्ष वयोमान लावण्यात आला होता. तेव्हा या महिलेच्या हृदयात एक पेसमेकर बसवण्यात आला होता. काही दिवसांनी त्याला जंतुसंसर्ग झाल्याने तो पेसमेकर काढावा लागला. संसर्ग कमी झाल्यावर महिलेला पुन्हा उजव्या बाजूने पेसमेकर बसवण्यात आला होता; परंतु पुन्हा पेसमेकरला जंतुसंसर्ग झाला. त्यामुळे ही महिला पुन्हा केईएममध्ये दाखल झाल्यावर आता या महिलेच्या हृदयाजवळ २.५ सेंटिमीटर आकाराचे लिडलेस पेसमेकर बसवण्यात आले आहे. त्याचा खर्च जवळपास ८ ते १० लाख रुपये इतका आहे; परंतु रुग्णालयात हे पेसमेकर मोफत बसवले गेले.

महागडे उपचार न परवडणारे

महिलेला वापरलेले पेसमेकर आठ ते १० लाख रुपयांचे आहे. हे उपचार सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नाहीत. दिल्लीत आतापर्यंत १०० रुग्णांवर या पेसमेकरद्वारे उपचार करण्यात आले. महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी दिल्लीतून टीम दाखल झाली होती. सरकारने पेसमेकरची किंमत जाहीर करावी आणि जोपर्यंत किंमत कमी होत नाही तोपर्यंत सीएसआर आणि डोनेशन जमा करून ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. १०० मधून एक ते दोन टक्क्यांमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. त्यामुळे त्याची मागणीही कमी असल्याचे केईएमचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. चरम लांजेवार यांनी सांगितले.

हेही वाचा: शब-ए-बरातवेळी भोंग्याचा आवाज कमी करा; मुंबई पोलीस आयुक्तांची सूचना

पेसमेकर यंत्राचे फायदे -

१. हृदयाची गती धीमी झाल्यास पेसमेकरचा वापर केला जातो. हे एक छोटे यंत्र असून हृदयाजवळ शस्त्रक्रियेद्वारे लावले जाते.

२. पेसमेकरची तार हृदयाच्या कप्प्यांमध्ये लावून हृदयाची गती कृत्रिमरित्या नियमित केली जाते.

३. अनेकदा पेसमेकरला जंतुसंसर्ग होतो. अशावेळी पेसमेकर हृदयातून काढला जातो. संसर्ग बरा झाल्यानंतर पुन्हा पेसमेकरची शस्त्रक्रिया केली जाते.

४. जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांना विना तारेचा पेसमेकर लावला जातो. जो हृदयाच्या कप्प्यात लावतात. सामान्य पेसमेकरच्या तुलनेत हा ९० टक्के कमी आकाराचा असतो. त्याचा कालावधी आठ वर्षांचा असतो.

पहिल्यांदाच पालिका रुग्णालयात इतके महाग पेसमेकर बसवण्यात आले. त्यासह नव्याने तयार केलेले १५ बेड्सचे आयसीसीयू सुरू झाले आहेत, जे सर्व विशेष शस्त्रक्रियांसाठी आत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज आहे.

- डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.

Web Title: Pacemaker Implanted In Womans Heart In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbaiwomenheart surgery
go to top