भारतीयांना उद्‌ध्वस्त करण्यासाठी पाकची साखर आयात : जितेंद्र आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे.

ठाणे : भारतीयांना उद्‌ध्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजप सरकारने आखले आहे; मात्र त्यांचे हे धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आज आमचा ऊस उत्पादक शेतकरी हमी भावासाठी रडत असताना पाकिस्तानातील साखर येथे आणून आमच्या शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले जात असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. पाकची ही साखर आमच्या देशात विकू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 

राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजारभावापेक्षा एक रुपयाने कमी किमतीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आव्हाड म्हणाले की, मी डिसेंबर 2017च्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यामधील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात करीत असल्याची माहिती सभागृहाला दिली होती. आता हीच साखर बाजारात विकली जाणार आहे. 

एकीकडे पाकिस्तानच्या नावाने बोंब ठोकायची आणि त्यांच्याच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पाकिस्तानी साखर आयात करायची म्हणजेच आपली अर्थव्यवस्था मेली तरी चालेल; पण पाकिस्तानची अर्थव्यवस्था जगली पाहिजे, अशी दुहेरी नीती सरकारने आखली आहे. त्यांचे हे बेगडी राजकारण आता उघडकीस आले आहे. 

Web Title: Pakistans sugar import to destroy Indians says Jitendra Awhad