शिवसेनेला जनताच जागा दाखवेल - महाजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पालघर - शिवसेनेने राजकीय खेळी करून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांचे पक्षांतर करून घेतले. त्यामुळे शिवसेनेला पालघरची जनताच त्यांची जागा दाखवेल, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. पालघरमध्ये झालेल्या विविध पक्ष कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार पास्कल धनारे, भाजप उमेदवार राजेंद्र गावित आदी उपस्थित होते.

देशात भाजपची 23 ठिकाणी सत्ता असल्याचे अधोरेखित करत जनता या निवडणुकीतही आपल्याच बाजूने कौल देईल, असा विश्‍वास महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेवर निशाणा साधत ते म्हणाले, की ठाणे-मुंबई सोडली तर शिवसेनेची कुठेही सत्ता नाही. त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना माघार घेईल, अशी अपेक्षा होती.

भाजपचाच गड शिवसेना बळकावू पाहत आहे. पालघर लोकसभेसाठी युती केली होती; मग आता हे राजकारण का, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

Web Title: palghar loksabha byelection shivsena girish mahajan politics