पाली बसस्थानक गैरसोईंचे आगार

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

सुधागड तालुक्‍यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेले पालीतील बसस्थानक म्हणजे गैरसोईंचे आगार आहे. १९७७ मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीची ४२ वर्षे कोणत्याही प्रकारची डागडुजी किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

पाली : सुधागड तालुक्‍यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेले पालीतील बसस्थानक म्हणजे गैरसोईंचे आगार आहे. १९७७ मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीची ४२ वर्षे कोणत्याही प्रकारची डागडुजी किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. जुनी व जर्जर झालेली धोकादायक इमारत, कोसळलेले स्लॅब, खराब भिंती, सांडपाण्याचा प्रश्न, स्वच्छतागृहाची दुरवस्था, बंद पडलेले पंखे, फुटलेले पत्रे, मोडकळीस आलेले बाकडे, सोई-सुविधांचा अभाव, स्थानकातील खड्डे यामुळे प्रवाशांसह परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचीही खूप मोठी गैरसोय होत आहे.

दिवाळी सणात स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची व भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. पाली हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. तसेच, सुधागड तालुक्‍यातील मुख्यालयाचे ठिकाणही आहे. बहुतांश प्रशासकीय कार्यालये, मोठी बाजारपेठ, कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालये; तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालीत आहेत. परिणामी कामानिमित्त, शिकण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील आणि गावांतील नागरिक; तसेच महाराष्ट्रातून असंख्य भाविक पालीत येत असतात. बहुतांश नागरिक परिवहन महामंडळाच्या गाड्यांचा वापर करतात. मात्र, पालीतील बसस्थानकाची अवस्था अत्यंत दुरापास्त झाल्याने त्यांची खूप मोठी गैरसोय होत आहे. 

दिवाळी सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची रेलचेल चालू असताना पंखे नसल्याने गरमी; तसेच विविध समस्यांनी प्रवासी हैराण होत आहेत. बसस्थानकाच्या नव्या इमारतीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी आंदोलने केली आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या हाती आश्वासनांशिवाय काहीही आलेले नाही. पाच वर्षांपासून या बसस्थानकाच्या दुरवस्थेसंदर्भात ‘सकाळ’ बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधत आहे.

दरम्यान, पाली बसस्थानकाच्या दुरुस्तीबाबत मुख्य कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार सुसज्य इमारत उभारणे कामी परिवहन विभाग नियंत्रक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीची पाहणी करून परिक्षणही करण्यात आले आहे. इमारतीच्या संदर्भातील सर्व निर्णय आणि माहिती रामवाडी विभागाकडून सांगण्यात येईल, असे स्थानकातून सांगण्यात येते.

फक्त श्रेयवाद
बसस्थानक इमारत दुरुस्ती व नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध झाल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी भाजपच्या वतीने देण्यात आली होती. इतर पक्षांनीही इमारत दुरुस्तीसाठी आपण कसे प्रयत्न केले आहेत, याची माहिती दिली; मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. दोन-तीन महिन्यांपूर्वी स्थानकाच्या आवारात उभे राहण्यासाठी प्रवाशांनीच पत्र्याची शेड उभारली. या वेळी वाटले होते की, आता बसस्थानकाच्या इमारतीच्या कामास सुरुवात होईल; मात्र तसे काहीही झालेले नाही.
 

स्थानकाची धोकादायक इमारत म्हणजे प्रवासी व कर्मचाऱ्याच्या जीवावरील टांगती तलवार आहे. कोणत्याही सुविधा नसल्याने भाविक व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सरकार येथील नागरिकांच्या संयमाचा अजून किती अंत पाहणार आहे. एखादी दुर्घटना घडल्यावर जाग येणार का? लवकर येथे नवीन इमारत करण्यात यावी.
- परेश शिंदे, पाली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pali bus depot is inconvenience