दिवाळे गावात बहिरीनाथाचा पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

नवी मुंबईतील दिवाळे गाव मासळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या गावातील दिवाळीच्या निमित्ताने होणारा बहिरीनाथाचा उत्सवदेखील तितकाच प्रसिद्ध आहे. बहिरीनाथाच्या उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला असून, रविवारी (ता.२७) सकाळी बहिरीनाथाचा अभिषेक व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नवी मुंबई : नवी मुंबईतील दिवाळे गाव मासळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या गावातील दिवाळीच्या निमित्ताने होणारा बहिरीनाथाचा उत्सवदेखील तितकाच प्रसिद्ध आहे. बहिरीनाथाच्या उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला असून, रविवारी (ता.२७) सकाळी बहिरीनाथाचा अभिषेक व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

या उत्सवाच्या वेळी वर्षभर समुद्रात राहणारा आपला लाडका देव येत असल्याने, गावात उत्साहाचे वातावरण पसरले होते. एकीकडे दिवाळी सणाची धामधूम; तर दुसरीकडे बहिरीनाथ देवाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. या उत्सवात देवाच्या दर्शनाला; तसेच नवस बोलण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, पनवेल, ठाणे येथून हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. चमत्कार वाटावा अशा प्रकारे घारापुरी बेटाजवळील समुद्रातून भैरीदेवाची मूर्ती शोधून, ती होडीने दिवाळे गावात आणली जाते. त्यानंतर गावचा दिवाळी उत्सव सुरू होतो. ही २५० वर्षांहून जुनी प्रथा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी गावातील ३०० हून अधिक तरुण ३५ ते ४० होड्या घेऊन बहिरीनाथ देवाला गावात आणायला घारापुरी बेटाजवळील समुद्रात जातात. समुद्रात बुडी मारून गावातील तांडेल कुटुंबातील पुरुष समुद्राखालून देवाची मूर्ती शोधून काढून होडीत आणतो. ही मूर्ती केवळ तांडेल कुटुंबातील पुरुषांनाच सापडते, अशी आख्यायिका आहे. देवाला अंघोळ घालून शेंदूरलेपन करून पालखीत बसवून मिरवणुकीने देवळात आणले गेले. रात्री गावजेवण व भजन-कीर्तनात, पारंपरिक कोळीगीतांनी देवाची आळवणी करण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवाला सकाळी अभिषेक घालून सायंकाळी पालखीत बसवून मोठ्या धामधुमीत ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. या वेळी गावातील भाविकांनी देवाला दिवाळीचा फराळ, मिठाई, नारळ, हार, फुले अर्पण केली. रात्री देवाला मंदिरात बसवून रात्रभर जागर करण्यात आला. 

उद्या पाडव्याला (सोमवारी) पहाटे ५ वाजल्यापासून मागील वर्षीचे नवस फेडायला व नवीन नवस बोलायला भाविकांची मंदिरात अलोट गर्दी होईल. केवळ नवी मुंबईतील नव्हे; तर पनवेल, उरण, ठाणे, मुंबई, कल्याण येथून हजारो भक्तगण दर्शनाला येतात. देवाला दिवाळी फराळासोबत नवस केलेल्या विविध वस्तू अर्पण केल्या जातात. त्यानंतर दुपारी १ च्या सुमारास देवाला पालखीत बसवून, वाजत-गाजत बंदरातील होडीत बसवून गावकरी व भाविक निरोप देतात. 
- भूषण कोळी, ग्रामस्थ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palkhi ceremony of Bahirinatha in Diwale village