पालघरचा `पलू' धबधबा खुणावतोय तरुणाईला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

विक्रमगमध्ये पर्यटकांची गर्दी; पावसाने हिरवाई, निसर्गसौंदर्यात भर 

विक्रमगड ः विक्रमगड आणि परिसरात दमदार पाऊस झाल्याने नदी, नाले, ओव्हळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. येथील निसर्गसौंदर्याबरोबरच पलूचा खळखळता धबधबा तरुणाईला भुरळ घालत आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत खळखळत्या पाण्यात चिंब होण्यासाठी ठाणे, मुंबईसह विविध ठिकाणचे पर्यटक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. 

विक्रमगडचा "पलू' आणि जव्हारचा "दाभोसा' धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. विक्रमगड शहरापासून काही किलोमीटरच्या अंतरावर डोंगर भागात उंचावरून वाहणारे हे पांढरेशुभ्र धबधबे अंगावर झेलण्यासाठी दूरवरील पर्यटक येथे आवर्जुन हजेरी लावतात. तालुक्‍यातील जंगलपट्ट्यात विविध प्रजातीचे आणि रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्याने पक्षी निरीक्षकही या भागात येतात.

पलूचा धबधबा जव्हार-विक्रमगड महामार्गापासून जांभा गावच्या ग्रामपंचायत परिसरात असून डोंगरी भागात वसलेला आहे. दगड व चिखलवाट तुडवतच येथे जावे लागते, तरीही या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते. येथे विविध प्रकारचे कीटक, फुलपाखरू, वनस्पती, वनौषधी (आवळे) आदीही पाहायला मिळतात. विक्रमगडपासून अवघे 8 किमीवर जांभा गावाजवळ हे प्रेक्षणीय स्थळ आहे.  पुढे काही कि.मी.वर जव्हारसारखे ठंड हवेचे ठिकाण असल्याने हे ठिकाण पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. 

कसे जाल? 
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर येथून विक्रमगड येथे पोहचावे. पुढे विक्रमगड येथून जव्हार मार्गाने 8 कि.मी. अंतरावर जांभा या गावापर्यंत गाडीने जावे. पुढे रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये गाडी पार्क करून जंगलातील पायवाट पकडून दोन कि.मी. अंतरावर हा नैसर्गिक धबधबा लागतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palu waterfall is immersed tourists in Vikramgam near Mumbai