पणती व्यवसाय विझला

पणती व्यवसाय विझला

रोहा : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. त्यामुळे तो जवळ येऊ लागल्यानंतर रायगड जिल्ह्यातील कुंभारवाडे मातीच्या पणत्यांनी भरून जात होते. आता या व्यवसायाला दुष्ट लागली असून वाड्यांमधून पणत्या गायब झाल्या आहेत. 

पूर्वी दसरा संपताच कुंभरवाड्यात मातीच्या पणत्या तयार करण्याची लगबग सुरू होत असे. आठवडाभरात हजारो पणत्या तयार होऊन बाजारात जायच्या. त्यांचा खपही चांगला होता. गेल्या आठ- दहा वर्षांत राजस्थान आणि गुजरात राज्यातून पणत्या येऊ लागल्या आहे. त्या मातीच्या पणत्यांपेक्षा स्वस्त आहेत. दिसायला आकर्षक असल्याने ग्राहकांचा कल त्याकडे अधिक असतो. त्यामुळे गेल्या 8 ते 10 वर्षांपासून स्थानिक कुंभारांनी मातीच्या पणत्या तयार करण्याचे काम जवळपास बंद केले आहे. 

पूर्वी दिवाळीत कुंभारवाडे पणत्या तयार करण्याच्या कामात दंग असत. आता त्यावर आधुनिकतेचे अतिक्रमण झाले आहे, असे सांगताना दमखाडी येथील वयोवृद्ध कारागीर शंकर तळेकर यांचे डोळे पाणावले. 
8 ते 10 वर्षे कुंभारवाड्यातील पणत्यांना उठाव नाही. त्यामुळे हा व्यवसाय तोट्याचा झाला आहे. त्यामुळे पणत्या तयार करणे बंद केले आहे. त्याऐवजी पाण्याचे माठ, मातीच्या चुली, खेळणी आणि किल्ले तयार करण्याकडे लक्ष दिले आहे; मात्र अजूनही मुहूर्तासाठी पणत्या तयार करण्याची परंपरा कायम आहे, असे रघुनाथ धाटावकर या वयोवृद्ध कारागिराने सांगितले. 

पूर्वी माती मोफत मिळत होती; परंतु हल्ली एक लॉरी मातीसाठी 2 हजार रुपये मोजावे लागतात. माती बारीक कुटून, मळून व त्यातील सर्व खडे वेगळे करून पणत्या हाताने बनवाव्या लागतात. त्या चांगल्या सुकवून भाजून घ्याव्या लागतात. त्यामुळे आमच्या पणत्यांची घाऊक किंमत दीड ते दोन रुपये प्रतिनग जाते. किरकोळ बाजारात त्या 30 ते 40 रुपये डझन भावाने विकल्या जातात. ही किंमत राजस्थानी पणत्यांच्या मानाने ग्राहकाला अधिक वाटते. त्याशिवाय साच्यात बनवलेल्या राजस्थानी पणत्यांचे अधिक डिझाईन मिळत असल्याने ग्राहकांना त्या अधिक पसंत पडत आहेत. त्यामुळे कुंभारवाड्यातील पणत्यांना उठाव नाही; परंतु कुंभारवाड्यातील पणत्या अधिक टिकाऊ असतात, हे पाहणे आवश्‍यक आहे, असे मत कारागीर आरती धाटावकर यांनी व्यक्त केले. 

राजस्थानी पणत्या वेगळ्या प्रकारची माती वापरून, थर्मल प्लांटमधून बाहेर पडणारी राख वापरून मशीनद्वारे तयार करण्यात येतात. त्यामुळे त्या स्वस्त असतात. घाऊक बाजारात 20 ते 25 रुपये प्रतिडझन किमतीने विकण्यात येतात. 
- पिंटू शाह, पणतीविक्रेता 

राजस्थानी पणत्यांमध्ये दर वर्षी नवीन आकार आणि रंगसंगती असते. मातीच्या स्थानिक पणत्यांपेक्षा स्वस्त आहेत. त्यामुळे त्याच खरेदी करतो. 
- अशोक शिर्के, ग्राहक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com