कल्याणमधील पणती बाजार कोसळला 

सुचिका करमरकर
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

दिवाळी हा दिव्यांचा सण. विविधरंगी विद्युत रोषणाईबरोबरच दारात पणती लावून या सणाचा आनंद द्विगुणित होतो. दिवाळीनिमित्त खरेदी करताना आकर्षक पणत्याही आवर्जून खरेदी केल्या जातात; मात्र परतीच्या पावसाने आपला मुक्काम वाढवल्यामुळे कल्याणमधील पणती व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मातीपासून पणती तयार झाल्यानंतर ती वाळण्यासाठी पावसाची उघडीप न मिळाल्याने हा बाजार कोसळला आहे.

कल्याण : दिवाळी हा दिव्यांचा सण. विविधरंगी विद्युत रोषणाईबरोबरच दारात पणती लावून या सणाचा आनंद द्विगुणित होतो. दिवाळीनिमित्त खरेदी करताना आकर्षक पणत्याही आवर्जून खरेदी केल्या जातात; मात्र परतीच्या पावसाने आपला मुक्काम वाढवल्यामुळे कल्याणमधील पणती व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मातीपासून पणती तयार झाल्यानंतर ती वाळण्यासाठी पावसाची उघडीप न मिळाल्याने हा बाजार कोसळला आहे. 

मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने तयार झालेल्या पणत्या वाळत नसल्याचे कल्याणातील कुंभार धनजीभाई यांनी सांगितले. मागील 70 वर्षांपासून त्यांच्या घरात मातिकाम केले जाते. धनजीभाई विविध आकारांतील लहान-मोठे घडे, माठ, मातीच्या शोभेच्या वस्तू तसेच दिवाळीत पणत्या तयार करतात. चाकावर फिरवून पणत्या करणाऱ्या कुंभारांची संख्या आता कमी होत चालली आहे.

काही ठिकाणी साचाद्वारे पणती तयार केली जाते. धनजीभाई चाकावर पणती तयार करतात. त्याचप्रमाणे राजस्थानमधून येणाऱ्या विविध आकाराच्या पणत्याही त्यांच्याकडे उपलब्ध असतात. या वर्षी केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात उशिरापर्यंत पाऊस आहे. यामुळे माती कामावर परिणाम झाला आहे. धनजीभाईंकडे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरातील किरकोळ विक्रेते पणती खरेदी करण्यासाठी येतात; मात्र या वेळी कमी प्रमाणात पणत्या तयार झाल्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. 

उलाढाल पन्नास टक्‍क्‍यांनी घसरली 
गणपती विसर्जन झाल्यानंतर दिवाळीच्या पणत्या, मावळे, किल्ले तसेच इतर शोभिवंत वस्तू तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. या वर्षी नवरात्रातही पाऊस झाल्याने कुंभारवाड्यात अनेक अडचणी आल्या. नवरात्रीनंतरही पावसाने विश्रांती न घेतल्याने दिवाळीत नेमके काय होणार? याची चिंता कुंभारांना आहे. या वर्षी पावसामुळे वार्षिक उलाढाल पन्नास टक्‍क्‍यांनी घसरल्याचे कल्याणमधील कुंभारांनी सांगितले. 

पावसामुळे आव्हान 
पावसामुळे पणत्या सुकण्यात मोठी अडचण येत आहे. पणती किंवा मावळे वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर केल्यास त्याला तडा जाण्याची शक्‍यता असते. यामुळे केवळ पंखा लावून हे सामान वाळवण्याचे आव्हान आहे; मात्र हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे पंख्याचा फारसा उपयोग होत नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Panati market in Kalyan collapsed