प्रेमाची बंदिश : पंडित जसराज व्ही. शांताराम यांचे जावई कसे बनले?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

मुंबईत १९६० मध्ये पंडित जसराज यांच्या जीवनात एक वेगळेच संगीत निर्माण झाले. ती होती प्रेमाची बंदिश.

पुणे - पंडित जसराज आतापर्यंतचे असे एकमेव भारतीय गायक आहेत, की ज्यांनी सातही खंडांत आपले गाणे नेले. आठ वर्षांपूर्वी २०१२ च्या जानेवारीत अंटार्क्‍टिका खंडात एका क्रूजवर त्यांनी आपल्या गायनाचा कार्यक्रम केला होता. अर्थात त्यांची थोरवी या अशा विक्रमांत नव्हती. आपल्या प्रतिभाशाली गायनाने त्यांनी जगभरातील कोट्यवधी गानरसिकांना ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी दैवी अनुभूती ते देत होते. आणि हे करतानाच त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात आपल्या प्रतिभेची सूरधाराही मिसळून तो प्रवाह अधिक पुढे नेला होता. हीच त्यांची महत्ता होय. 

व्ही. शांताराम यांचे जावई
मुंबईत १९६० मध्ये पंडित जसराज यांच्या जीवनात एक वेगळेच संगीत निर्माण झाले. ती होती प्रेमाची बंदिश. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची कन्या मधुरा यांच्याशी जसराज यांचा परिचय झाला आणि लवकरच ते विवाहबद्ध झाले, महाराष्ट्राचे जावई बनले. व्ही. शांताराम यांची कन्या मधुरा यांचा जन्म १९३७ मधील. मधुरा यांनी १९५२ पासून गायनास सुरूवात केली. १९६० रोजी मधुरा आणि पंडित जसराज यांच्यात पत्रव्यवहार सुरू झाला. तो खूपच औपचारिक होता. एकदा मधुरा यांनी जसराज यांना गाणे ऐकवले. त्यांना ते आवडले. मधुराचा कल जसराज यांच्याकडे आहे, हे शांताराम यांनी ओळखले. एकदा जसराज यांना किती कमाई आहे, अशी विचारणा शांताराम यांनी केली. तेव्हा २०० ते ३०० रुपये महिन्याकाठी कमावतो, असे सांगितले. एकदा मधुरा वडिलांना म्हणाली, मी लग्न करेन तर जसराज यांच्याशीच. अखेर १९ मार्च १९६२ रोजी मधुरा शांताराम या मधुरा जसराज बनल्या. 

हे वाचा - तबलजी ते संगीत मार्तंड; कुमार गंधर्वांच्या एका वाक्याने बदललं आयुष्य

वाजपेयींनी दिली होती रसराज उपाधी
कविता आणि संगीतातील जाणकार, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे प्रचंड चाहते होते. पंडित जसराज यांना त्यांनी रसराज (रास के राजा) अशी उपाधी दिली होती. पंडित जसराज यांनी आपल्या आत्मकथेत रसराज: पंडित जसराज च्या प्रकाशन सोहळ्यात याबाबतचा खुलासा केला आहे. आत्मकथेच्या लेखिका सुनीता बुद्धिराजा म्हणाल्या की, पंडित जसराज यांनी श्रोत्यांना ही उपाधी अटलजींनी आपल्याला दिल्याचे सांगितले होते. ही उपाधी त्यांना खूप आवडत होती. संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनीही जसराज यांना रसराज ही उपाधी खूपच आवडत असल्याचे सांगितले होते. 

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandit jasraj wife madhura is daughter of v shantaram