पॅनेल पद्धतीची मतपरीक्षा मतदानासाठी ठाणे सज्ज 

पॅनेल पद्धतीची मतपरीक्षा मतदानासाठी ठाणे सज्ज 

ठाणे - ठाणे पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी काही तास शिल्लक असून ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी, यासाठी पालिकेचा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. यंदा चार प्रभागांचे एक पॅनेल आहे. 33 प्रभागांतून 131 जागांकरिता ही निवडणूक होत आहे. त्यामुळे पॅनेल पद्धतीची ही अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यासाठी 12 निवडणूक निर्णय अधिकारी, 36 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक हजार 704 मतदान केंद्रे, 10 ते 15 मतदान केंद्रांसाठी 140 क्षेत्रीय अधिकारी आणि 13 हजार कर्मचारी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

एका मतदाराला चार मते देण्याचे बंधन असल्याने मतदानादरम्यान नागरिकांचा गोंधळ उडण्याची शक्‍यता गृहीत धरून निवडणूक विभागासह उमेदवारांनीसुद्धा मतदान कसे करावे, यासंबंधी चित्रफितींच्या आणि सोशल मीडियातून जनजागृती केली आहे. याशिवाय, नागरिकांना मतदान करण्यासाठी जवळच्या जवळ मतदान केंद्र असावे म्हणून 750 मतदारांसाठी एक मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. दोन किलोमीटर परिघामध्येच ही मतदान केंद्रे आहेत. 

मतदान केंद्रावर अ (पांढरा रंग), ब (फिका गुलाबी), क (फिका पिवळा), ड (फिका निळा) अशा पॅनेलवर उमेदवारांच्या संख्येनिहाय मतदान यंत्रे असतील. अनेक ठिकाणी दोनच यंत्रांवर चार पॅनेलमधील उमेदवारांना मतदान करावे लागणार असल्याने गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. शिवाय, एका मतदाराला चार मते देणे बंधनकारक असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगा लागण्याची शक्‍यता आहे. मतदानासाठी वेळ कमी पडेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. याबाबत निवडणूक विभागाने विशेष दक्षता घेतली आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या प्रबोधनासाठी रंगनिहाय मतपत्रिकेचा नमुना लावण्यात येणार असल्याची माहिती उपनिवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. 

97 केंद्रे संवेदनशील 
निवडणुकीसाठी एक हजार 704 मतदान केंद्रे असून यातील 97 केंद्रे संवेदनशील आहेत. सर्व मतदान केंद्रांवर चोख सुरक्षेसह सीसी टीव्ही लावले आहेत. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त कुमक असेल. पालघर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि जळगाव येथून दोन हजार 150 ईव्हीएम कंट्रोल युनिट आणि पाच हजार 300 मतदान यंत्रांसह साहित्य आणण्यात आले आहे. प्रभाग 29 मध्ये फक्त तीनच पनेल आहेत. प्रभाग तीनमध्ये सर्वाधिक 40 उमेदवार असून येथे चार मतदान यंत्रे असतील. प्रत्येक यंत्राची 14 उमेदवारांसह नोटा या पर्यायाची व्यवस्था आहे. 

मतदान जनजागृती अभियान 
पालिका निवडणुकीसाठी आजवर जेमतेम 52 ते 55 टक्के मतदान होत आले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक विभागाने मतदार जनजागृती अभियान सुरू केले आहे. शहरात मतदान करण्यासंबंधी चित्रफिती आणि पोस्टर्सद्वारे प्रचार सुरू आहे. याशिवाय, प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये आणि त्यांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासंबंधीचा प्रसार निवडणूक विभागाकडून केला जात आहे. याशिवाय, राज्य निवडणूक आयोगाचे मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट चित्ररथ तयार केला असून हा चित्ररथ शहरभर फिरवून मतदानाचा संदेश दिला जात आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून महापालिका मुख्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com