काळ नदीत पाणमांजरांचे दर्शन

काळ नदीत पाणमांजरांचे दर्शन

रोहा : तालुक्‍यातून वाहणाऱ्या काळ नदीत पामाणगावजवळ काही दिवसांपासून पाणमांजराचे दर्शन घडत आहे. वन्यजीव निरिक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या असून ही नदी जलप्रदूषणमुक्त असल्याचे हे संकेत समजण्यात येत आहेत. सध्या गावाच्या परिसरातील 2 ते 5 किलोमीटर परिसरात या जीवाचे वास्तव्य आहे. 

रायगड जिल्ह्यात नद्या, डोंगर, वनराई, समुद्रकिनारे अशी मुक्तहस्ते निसर्गाने उधळण केली आहे; परंतु काही वर्षांपासून औद्योगिकीकरणामुळे त्यावर घाला घातला आहे. अनेक प्रमुख नद्या तर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. मात्र माणगाव येथील काळ नदीत पाणमांजर दिसत असल्याने ही नदी अजूनही प्रदूषणापासून मुक्त असल्याचे समाधान निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहेत. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या बेतात असताना या नदीच्या वरच्या भागात पाणमांजर दिसून येत असल्याचे वन्यजीव निरीक्षक आनंद मोहिते यांनी सांगितले. नदीपात्रातील कमकुवत, आजारी मासे; तसेच मृत मासे खाऊन पाणमांजरे पात्र स्वच्छ ठेवतात. नदीतील मोठी कोळंबी आणि कासवही ते खातात. या वर्षी उन्हाळ्यात 14 रानमांजरे नदीत दिसली असल्याचे निरीक्षण वन्यजीव निरीक्षक शंतनू कुवेस्कर यांनी नोंदवले आहे. पाणमांजरे आपल्या ठिकाणापासून 2 ते 5 किलोमीटर परिसरातच फिरत असतात. ती मूळ ठिकाणापासून फार दूर जात नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी पनवेल तालुक्‍यातील कासाडी नदीत पाणमांजर दिसल्याची चर्चा होती. 
 
असे आहे पाणमांजर 
स्तनवर्गाच्या मांसाहारी-गणातील मुस्टेलिडी कुळातला हा प्राणी आहे. हा लुट्रा वंशाचा असून याचे शास्त्रीय नाव लुट्रा पर्स्पिसिलेटा आहे. भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आणि भारताबाहेर ब्रह्मदेश, इंडोचायना आणि मलायात आढळतो. याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो. सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर हा राहतो. 

काळ नदीत हल्ली वरच्या भागात निजामपूर भागात पाणमांजराचे वास्तव्य दिसून येत आहे. नदीतील दगडांवर बसून ही पाणमांजरे मासे, कोळंबी खाताना दिसतात. 
- आनंद मोहिते, वन्यजीव निरीक्षक 

उन्हाळ्यात एप्रिल ते जूनपर्यंत काळ नदीचे पाणी कमी होताच माणगावजवळ पाणमांजरे दिसून येतात. या वर्षी 14 पाणमांजरे दिसली होती. 
- शंतनू कुवेस्कर, वन्यजीव अभ्यासक 
 
पाणमांजरे नदीतील आपले ठिकाण सहसा सोडत नाहीत. त्यांना व्यत्यय नसल्यास आपल्या ठिकाणच्या 2 ते 5 कि.मी. परिसरात ती वावरत असतात. 
- राहुल खोत, सहायक संचालक, मुंबई निसर्ग इतिहास संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com