कंपनीची कॅश लुटण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पनवेल - पनवेलमधील शिवाजी रोड परिसरातील बॅंक ऑफ इंडियातून पैसे काढण्यासाठी गेलेल्या कंपनी व्यवस्थापकाला लुटण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारच्या सुमारास करण्यात आला. व्यवस्थापकाने दाखवलेल्या धैर्यामुळे चोरट्यांना मोटरसायकल सोडून पळ काढावा लागला आहे. भरदुपारी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.  

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्‍ट लिमिटेड या कंपनीत अनिल देशमुख व्यवस्थापक म्हणून काम करतात. सोमवारी (ता.१७) दुपारी दिडच्या सुमारास शहरातील शिवाजी रोडवर असलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी ते गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते बॅंकेबाहेर पडले, त्याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी देशमुख यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुख यांनी प्रसंगावधान राखत पिशवी अधिकच घट्ट पकडली. या झटापटीत चोरटे मोटरसायकलवरून खाली पडले. देशमुख आणि चोरट्यांमध्ये होत असलेल्या झटापटीमुळे आजूबाजूचे नागरिक धावून आले. जमावाला पाहून घाबरलेल्या चोरट्यांनी मोटरसायकल टाकून पळ काढला. पनवेलमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे सत्तारूढ पक्षाच्या आमदाराच्या कंपनीचे पैसे सुरक्षित नसल्याची चर्चा शहरात होत आहे. दरम्यान, या सर्व घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी मोटरसायकल ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Web Title: panvel news cash crime