पनवेलचा पारा चढणार

दीपक घरत 
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पर्यावरणाला फटका; विकासकामांमुळे हरित क्षेत्रात घट

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता करण्यात आलेल्या भरावामुळे पनवेल परिसरातील काही भागाला पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला आहे. त्यात भर म्हणून झापाट्याने सुरू असलेल्या विकासकामांमुळे वनक्षेत्र आणि शेतीक्षेत्र कमी झाल्याने भूपृष्ठाच्या तापमानात ३ अंशांनी वाढ झाली असून विमानतळामुळे हवेतील तापमानातही अंशतः वाढ होणार आहे. त्यामुळे येत्या काळात पनवेलचा पारा चढणार असल्याचे पालिकेने सादर केलेल्‍या पर्यावरण अहवालामुळे स्पष्ट झाले आहे.

मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक एस. एम. कोठे यांच्या माहितीनुसार सध्या बिघडलेले पर्यावरण वाचण्याकरिता वेळीच उपाययोजना राबवल्या न गेल्यास विमानतळ परिसरात वाढणार असलेली वाहनसंख्या आणि विमानाच्या उड्डाणावेळी जळणाऱ्या इंधनामुळे वायुप्रदूषणात आणि ध्वनिप्रदूषणात देखील वाढ होणार आहे. झपाट्याने सुरू असलेल्या विकासकामांमुळे हरितक्षेत्र कमी होत असल्याचा परिणाम पनवेलच्या पर्यावरणावर झाला आहे. तीन वर्षांत ७७.९ टक्‍क्‍यांवरून ४६.४ टक्‍क्‍यांवर आलेली शेती आणि २४ टक्‍क्‍यांवरून ७७.९ टक्के भागात झालेले काँक्रीटीकरण यामुळे पाणथळ क्षेत्र कमी होऊन भूपृष्ठाच्या तापमानात ३ टक्के वाढ झालेली असतानाच नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळामुळे हवेतील तापमानातही वाढ होणार आहे.

नेदरलॅंड देशातील सर्वात व्यस्त विमानतळ परिसरात करण्यात आलेल्या पाहणीतून विमान उड्डाणावेळी जळणाऱ्या इंधनामुळे तापमान, वायुप्रदूषणात आणि ध्वनिप्रदूषणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. येत्‍या काळात पालिकेने याबाबत योग्‍य उपाययोजना न केल्‍यास पनवेलकरांना पर्यावरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्‍यांना सामोरे जावे लागणार आहे. 

यंत्रणेची आवश्‍यकता 
पालिकेच्या स्थापनेपासून पालिका हद्दीतील हवेतील प्रदूषण मोजण्याकरिता ‘रियल टाईम एयर क्वॉलिटी मोनीट्रिंग सिस्टिम’ बसवण्याची मागणी केली जात आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनीसुद्धा याकरिता अनुकूलता दर्शविली आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून याकरिता यंत्रणा कशी काम करते आणि कोणती यंत्र घेणे योग्य होईल, याची माहिती मागवण्यात आली आहे; मात्र अद्याप याविषयीची माहिती एमपीसीबीकडून देण्यात आलेली नाही. या यंत्रणेमुळे मानवी आरोग्यासाठी घातक असणारे घटक हवेत किती प्रमाणात आहेत, याची तत्काळ माहिती मिळत असल्याने उपाययोजना करणे सोपे जाते.

विमानाचे उड्डाण प्रति सेकंदाला होत नसल्याने त्याचा जास्त परिणाम प्रदूषणावर होणार नसला तरी अंशतः काही प्रमाणात प्रदूषणात वाढ होणारच आहे.
- डॉ. एस. एम. कोठे, 
प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ, पर्यावरण विभाग

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panvel's mercury will rise