पक्षाघातांच्या उपचारांसाठी वीस तास वाढले 

पक्षाघातांच्या उपचारांसाठी वीस तास वाढले 

मुंबई - पक्षाघाताचा झटका आल्यानंतर फक्त चार तासांत उपचार सुरु झाल्यास रुग्णाला त्यातून सावरता येत होते. मात्र आता महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात सुरु झालेल्या नव्या व्यापक पक्षाघात उपचार केंद्रात झटका आल्यानंतर चोवीस तासांत उपचार झाले तरीही रुग्णाला जीवनदान मिळणार आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा महापालिकेच्या इतरही रुग्णालयांत टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येईल. देशभरातील अशा प्रकारचे हे पहिले केंद्र आहे. 

जगभरात हृदयविकारानंतर ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णाला वाचवण्यासाठी पहिले चार तास गॉल्डन अवर्स मानले जातात. या काळात रुग्णाला उपचार सुरु झाले नाहीत. तर शरिरातील लकवा पूर्णपणे बरा होण्याची शक्‍यता कमी असते. ही गंभीरता लक्षात घेत पालिका रुग्णालयात सेवा सुरु करण्यात असल्याची घोषणा मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागात अद्यायावत व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरु करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. 

तब्बल आठ कोटी रुपयांची ही मशीन पुढील आठवड्‌यापासून रुग्णसेवेत रुजू होईल, अशी माहिती मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागाचे प्रा. डॉ नितीन डांगे यांनी दिली. त्यासाठी केईएम रुग्णालयातील डॉक्‍टरांची टीमही सज्ज असल्याचेही मज्जांततू शल्य चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ संगीत रावत म्हणाल्या. रुग्ण केईएममध्ये दाखल झाल्यानतंर तासभरात त्याच्यावर थ्रोम्बोक्‍टॉमी ही शस्त्रक्रिया करण्यात येईल, या पद्धतीने व्यवस्थापन आखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या उद्घाटनप्रसंगी महापौर विश्‍वनाथ महाडिक, पालिका आयुक्त अजॉय मेहता, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत राईत, पालिका आरोग्य समिती अध्यक्षा डॉ अर्चना भालेराव तसेच केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि पालिका वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक पालिका रुग्णालये प्रमुख डॉ अविनाश सुपे आदी मान्यवर उपस्थित होते. 

3 हजार 600 रुग्णांपैकी केवळ 50 रुग्णांना मिळाले ब्रेन स्ट्रोकपासून वाचवण्यात यश 
ब्रेन स्ट्रोक झालेल्या रुग्ण चार तासांच्या आत रुग्णालयात दाखल झाला तर या रुग्णाला थ्रोम्बोलायसिस हे इंजेक्‍शन दिले जाते. या इंजेक्‍शनमुळे मेंदूतील रक्‍ताची गुठळी विरघळते. हे इंजेक्‍शन पंचवीस ते चाळीस हजारांत उपलब्ध असते. पालिका रुग्णालयात याबाबत मोफत उपचार मिळतात. मात्र चार तासांच्या आत ब्रेन स्ट्रोकच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांची संख्या फारच कमी असल्याचे मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ संगीता रावत म्हणाल्या. केईएम रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत 3 हजार 600 रुग्ण ब्रेन स्ट्रोकच्या उपचारांसाठी आले. मात्र त्यापैकी केवळ 54 रुग्णांना थ्रोम्बोलायरिस हे इंजेक्‍शन मिळाले. 54 रुग्णांपैकी केवळ 50 रुग्ण चार तासांच्या आत आल्याने त्यांच्या मेंदूतील रक्‍ताची गुठळी पूर्णपणे काढता आली. त्यामुळे चार तासानंतर येणा-या रुग्णांना व्यापक पक्षाघात उपचार केंद्रात उपचार दिले जातील. ब्रेन स्ट्रोकबाबत जनजागृतीवरही भर द्यायला हवा, असा मुददाही यावेळी मांडण्यात आला. 

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एका तासात होणार शस्त्रक्रिया 
व्यापक पक्षाघात उपचार केंद्रात अद्यायावत मशीनच्या आधाराने थेट मेंदूतील रक्तवाहिन्यात स्टेंट घातले जातील. हे स्टेंट रक्तवाहिन्यातील गुठळी विरघळून टाकणार. यासाठी केवळ पंचवीस मिनिटांचा वेळ लागणार. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सिटी स्कॅन, एमआर या महत्त्वपूर्ण चाचण्या तातडीने केल्या जातील. रुग्ण अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवेत दाखल झाल्यानंतर लक्षणे ओळखून वैद्यकीय अधिकारी ब्रेन स्ट्रोक रुग्णाची माहिती वरिष्ठ डॉक्‍टरांना देईल. यासाठी रेडिओलॉजी, अनेस्थेशिया,फिजीशियन, पॅथॅलोजी, न्यूरोसर्जरी विभागातील डॉक्‍टरांची टीम व्हॉट्‌सग्रुपच्या माध्यमातून समन्वय साधत राहणार. या कामासाठीचे मोकड्रीलही एका एनजीओच्या माध्यमातून पार पाडण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेसाठी दोन लाखांचा खर्च येईल. परंतु वैद्यकीय योजनांतून ही शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध आहे. 

उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाची थाप 
पालिकेचा आपल्याला अभिमान आहे. जगभरात सर्वोच्च रुग्णसेवा पालिकेत दिली जाते. त्यामुळे केईएम रुग्णालयातील सर्व सहकार्यांना मानाचा मुजरा करायला आपण आलोत, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केईएम रुग्णालयाची प्रशंसा केली. पालिकेला कित्येकदा टीकेचे धनी व्हावे लागते. मात्र पालिकेकडून सर्वोत्तम सेवा दिली जाते कारण टीमवर्क येथे योग्यरितीने घडते. इथे गटार साफ करणारा कामगार ते महापौरापर्यंत सर्वांनी आपापले क्षेत्र सांभाळले तर उत्तम कामगिरी पार पडली जाईल, असेही ठाकरे म्हणाले. पक्षाघातामुळे रुग्णाचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. मात्र त्यातून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी केईएमचा पुढाकार खूप चांगला आहे. उत्तम रुग्णसेवेसाठी मी केईएमचा आभारी आहे,असे सांगत ठाकरेंनी प्रशंसा केली. 

डॉक्‍टरांनो टॅक्‍नोसॅव्ही व्हा 
अद्यायावत तंत्रज्ञानाच्या बळावत व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरु करण्यात आल्यानंतर जगभरातील नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध करण्यासाठी टीम तयार करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिली. तसेच रुग्णालयातील गर्दी आवरण्यासाठी प्रत्येक रुग्णामागे केवळ दोनच नातेवाईकांना परवानगी सक्तीने पाळली जाईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com