श्रीवर्धनमध्‍ये पब्जीमुळे पालक हैराण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

मोबाईलच्या अतिवापराने ग्रामीण भागातील मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करून पब्जी खेळाकडे जास्त आकर्षित होत आहेत. परिणामी, मुलांच्या चिंतेमुळे पालकच मानसिक आजाराला बळी पडण्याची शक्‍यता वाढली आहे.

बोर्लीपंचतन (बातमीदार) : मोबाईलच्या अतिवापराने ग्रामीण भागातील मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करून पब्जी खेळाकडे जास्त आकर्षित होत आहेत. यामुळे मुले पब्जी खेळाने डोक्‍यावर परिणाम झाल्यागत वागू लागली आहेत. परिणामी, मुलांच्या चिंतेमुळे पालकच मानसिक आजाराला बळी पडण्याची शक्‍यता वाढली आहे.

जीवघेण्या पब्जी खेळाने अक्षरशः लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत संपूर्ण जगाला झपाटले आहे. शाळेतील लहान मुले आज ज्या ठिकाणी नेटवर्क चांगले मिळेल, त्या ठिकाणी आपली जागा कायम करत आहेत. पब्जी खेळताना कुणी पाहिले तरीही ते कुणालाच घाबरता नाही. आपला खेळ बिनधास्त चालू ठेवतात. काही छोटी मुले तो खेळ कुतूहलाने पाहत असतील, तर त्यांच्या मनातही तो खेळ खेळण्याची इच्छा आपोआप निर्माण होते. तहान, भूक हरवून आपल्या विश्‍वात एकटेच सध्या ही मुले रमत असल्याने पालक अक्षरश: भीतीच्या छायेत आहेत. त्यांना ओरडूनही ऐकत नसल्याने अवस्था अगदीच वाईट झाली आहे. पालकांचेही मन मुलांच्या चिंतेमुळे लागत नाही. काही ठिकाणी तर पालकांवर मानसिक त्रासाने आजारी पडण्याची वेळ आली आहे.

लहान मुलांचा हट्ट
पब्जी खेळता यावे यासाठी लहान मुले आईवडिलांकडे हट्ट करून महागडे मोबाईल मागू लागले आहेत. ग्रामीण भागातील राहणाऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने मुलांना मोबाईल कुठून आणून देणार? असा प्रश्न त्यांना पडत आहे. एक तर महागाईमुळे बेकारी आल्याने जगणेही कठीण झाले आहे. त्यात आता हा नवीन रोग मानगुटीवर येऊन बसलाय, अशा भावना काही पालक व्यक्त करत डोळ्यात पाणी आणून सांगतात, सरकारने ठोस निर्णय घेऊन पब्जी खेळ बंद करून आमच्या मुलांना वाचवावे आणि भारताच्या या तरुणाईला जगवावे.

नात्यांमध्ये दुरावा
रात्रभर ही मुले पबजी खेळाच्या आहारी गेलेली दिसतात. इतकेच नाही तर पबजीने त्यांना इतके झपाटले आहे की, ते झोपेतही काहीही बडबड करत असतात. घरच्यांसह जवळच्या लोकांनी त्यांना या खेळापासून दूर राहा, असे सांगण्याचा प्रयत्न केला, तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. परिणामी, नात्यांमध्येच दुरावा निर्माण झाला आहे. काही मुले तर एवढी स्वभावाने आक्रमक झाली आहेत की, कुणावरही ते ओरडत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parants are in tension by PubG game