लोकल कोंडीतून सुटका! 

लोकल कोंडीतून सुटका! 

मुंबई - तब्बल 22 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले परळ स्थानक अखेर रविवारी (ता. 4) "परळ टर्मिनस' म्हणून उदयास आले. रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. उद्या (ता. 5)पासून येथून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे दादर स्थानकावरील "कोंडी'तून प्रवाशांची सुटका होईल; शिवाय दुसरे दादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळमधील नव्या व्यापार केंद्राला या टर्मिनसमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

परळ टर्मिनसहून सध्या अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी 16 लोकल सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे दादर स्थानकावरील दीड ते दोन लाख प्रवाशांचा भार हलका होणार आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गालाही मंजुरी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी रविवारी जाहीर केले. तसेच, मध्य रेल्वे मार्गावर रविवारपासून 15 डब्यांच्या सहा नव्या लोकल सुरू झाल्या आहेत. परळ, लोअर परळ हा परिसर व्यापार केंद्र म्हणून विकसित झाला असला, तरी ब्रिटिश काळापासून वाहतुकीच्या सुविधा बदलल्या नव्हत्या. परळ टर्मिनसमुळे या व्यापार केंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लापर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर परळ टर्मिनसहून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. काही तांत्रिक कारणास्तव सीएसटीपर्यंत लोकल जात नसल्यास त्या कुर्ल्याहून वळवल्या जातात; मात्र आता या लोकल परळ टर्मिनसपर्यंत जावू शकतील. 

अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान चिखलोली स्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले. या परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढल्याने नव्याने विकसित होणाऱ्या या परिसराला त्याचा फायदा होणार आहे. 

अलिबाग-पेण मार्गावर लवकरच पॅसेंजर 
अलिबाग-पेण मार्गावरून पॅसेंजर सेवा सुरू करण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करत आहे, असे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले. पेण ते थळ आणि जासई ते उरणपर्यंतच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. हा 28 कि.मी.चा मार्ग 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. 

दोन तासांचा प्रवास  45 मिनिटांवर   
रेल्वेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे महालक्ष्मी, ना. म. जोशी मार्गावरून चेंबूरला रस्तामार्गे येण्यासाठी दीड-दोन तास लागत असत. आता केवळ 45 मिनिटांत हा प्रवास होईल. या परिसरातील नवी कॉर्पोरेट कार्यालये, रुग्णालये मोनोशी जोडली जाणार आहेत. लोकलने महालक्ष्मी स्थानक किंवा करीरोड येथून चेंबूरला जाण्यासाठी प्रत्येकी तीन आणि दोन लोकल बदलाव्या लागत होत्या. आता मोनोमुळे हा प्रवास एकमार्गी होईल. 

नवे काय? 
- अंबरनाथ स्थानकावर नवे पादचारी पूल, पाच सरकते जिने, बदलापूर स्थानकात दोन नवे पूल आणि दोन सरकते जिने. 
- फलाटांवर 16 उद्‌वाहकांचे काम सुरू, 170 उद्‌वाहक बसवणार. 
- 37 सरकत्या जिन्यांचे काम सुरू, 180 सरकत्या जिन्यांना मंजुरी. 
- 130 पादचारी पुलांचे काम सुरू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com