नेरूळमधील उद्याने कोमेजली

नेरूळमधील उद्याने कोमेजली

ऐरोली - उद्यानांचे शहर म्हणून शेखी मिरवणाऱ्या नवी मुंबई शहरातील महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या नेरूळमधील काही उद्यानांची हिरवळ सुकत चालली आहे; तर काहींच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे ढीग आहेत. अनेक ठिकाणी तर प्रवेशद्वार तुटले आहेत. नवी मुंबई पालिका स्वच्छ भारत अभियानात पहिल्या क्रमांक पटकावण्यासाठी अग्रेसर असताना शहरातील हे चित्र चर्चेचा विषय ठरले आहे. 

नेरूळ सेक्‍टर २४ येथील चिंचोली तलाव उद्यान हे सर्वात जास्त दुरावस्था झालेले उद्यान आहे. प्रवेशद्वाराजवळ लावलेले शोभीवंत खांब तुटले आहेत. मार्गिकेवरील शोभीवंत कूंपण भिंतीवरील जाळी तुटली आहे. बैठकव्यवस्था असलेल्या शेडची दुरावस्था झाली आहे. उजवीकडे तयार केलेला कृत्रिम झरा आटला असून पंप बिघडला असल्याने पाणी पडणे बंद झाले असल्याचे नागरिक सांगतात.

पूर्वेकडे झाडांच्या तोडलेल्या फांद्या टाकून ठेवल्या आहेत. मार्गिकेवरील फारशा निखळल्या आहेत. 

सेक्‍टर ३ : येथील बस डेपो उद्यानातील आसने तुटली आहेत. कुंपणावर कपडे वाळत घातले जातात. उद्यानात दारुडे झोपलेले असतात. शेजारच्या हॉटेलातून तेलाच्या रिकाम्या प्लास्टिक पिशव्या उद्यानात टाकल्या जातात. हिरवळ व झुडुपे खराब झाली आहेत.

सेक्‍टर १: येथील निलगिरी उद्यानांचे नामफलकावरील नावच गायब आहे. कुंपणाचे लोखंडी ग्रील तुटले आहे. कचरा इतरत्र पसरला आहे. हिरवळ खराब झाली आहे. उद्यानातून जाणाऱ्या गटाराला भगदाड पडले आहे. ते उद्यानात खेळणाऱ्या मुलांना धोकादायक ठरत आहे. उद्यानाच्या कुंपणावर शेजारील रहिवासी कपडे वाळत घालतात.

सेक्‍टर ९ : बिंदू माधव ठाकरे उद्यानाचे प्रवेशद्वार तुटले आहे. त्याला साखळीने बांधून टाळे ठोकले आहे. तेथेच कचऱ्याचे ढीग साचले आहेत. उद्यानाचे इतर प्रवेशद्वारसुद्धा टाळेबंद असून शेजारी असलेल्या मंदिराच्या मागून उद्यानात प्रवेश करावा लागतो. मंदिरातील सांडपाणी उद्यानात सोडले जाते. तण वाढले आहे. झुडुपे खराब झाली आहेत.

सेक्‍टर ९ : आंबेडकर उद्यानातील मार्गिकेवरील व पायऱ्या व मंचावरील फरशा तुटल्या आहेत. झुडुपांखाली उंदरांनी बिळे केली असून मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. कुंपणाच्या भिंतींना भगदाड पडले आहेत. बागेत दारूच्या फुटलेल्या बाटल्या पडल्या आहेत. समाजमंदिरकडील प्रवेशद्वारापाशी  कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. 

सेक्‍टर ९ : मॅंगो गार्डनमधील मार्गिकेच्या फरशा निखळल्या आहेत. गेट तुटले असल्याने ते उघडेच असते. कचरा व दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्या आहेत.

सेक्‍टर ८ : येथील छत्रपती शाहू महाराज उद्यानात खाद्यपदार्थ विक्रेते फिरत असतात. उद्यानात पाळीवप्राण्यांना बंदी आहे; मात्र भटकी कुत्री फिरत असतात. अनेक दिवे फुटलेले व बंद आहेत. उद्यानात पुरेसा उजेड नसल्याने रात्रीच्या वेळी मद्यपी दारू पीत बसतात. 

याबाबत अधिक माहितीकरिता उद्यान विभागाचे उपआयुक्त नितीन काळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

चिंचोली तलाव उद्यानात असलेला झरा बंद आहे. प्रवेशद्वारापाशी असलेले खांब व जाळी कोसळली आहे. बैठक शेडची दुरावस्था आहे. तलावाजवळ व आत कचरा पडलेला असतो. हिरवळ व झुडुपे खराब झाली आहे. पालिकेने लक्ष देऊन सुधारणा करावी.
-विजय बोराडे, नेरूळ

एकूण क्षेत्रफळ - १,५२,३३२ चौ. मी.
नेरुळ विभागातील उद्याने - ३४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com