बेस्टच्या आगारांत करा पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

बेस्ट उपक्रमाने मुंबईतील सर्वच २७ आगारांमध्ये पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : मुंबई पालिकेने अनधिकृत पार्किंगविरोधात मोहीम उघडली आहे. त्यावरून असंतोष निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बेस्ट उपक्रमाने मुंबईतील सर्वच २७ आगारांमध्ये पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शहरातील चार आगारांमध्येच पार्किंग सुविधा होती. आता जागेचे नियोजन करून सर्वच आगारांमध्ये पार्किंग सुविधा उपलब्ध करताना त्याचे दर कमी करण्याचा निर्णयही बेस्टने घेतला आहे. 

मुंबईत पार्किंगसाठी जागा अपुरी आहे. त्यामुळे अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जात आहेत. पार्किंगच्या समस्येवर उपाय म्हणून बेस्टने असा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या मालकीची मुंबईत मोठी जागा आहे. आगारांमध्ये सध्या बसचा ताफा सुमारे ३,७०० गाड्यांचा आहे. उर्वरित जागेवर पार्किंगचा पर्याय खुला करण्याच्या पयार्याची चाचपणी झाली. त्यात चार आगारांमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली. आता पार्किंगची व्याप्ती सर्वच आगारांमध्ये वाढविण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. सर्व आगारांत दुचाकी-चारचाकीसह सर्वच वाहनांसाठी पार्किंगची सुविधा खुली झाली आहे. त्यासाठी पूर्वीच्या दरांतही घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बेस्टच्या भाड्यात कपात करण्यापाठोपाठ आता पार्किंगचे दरही कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय बेस्टने घेतला आहे. बेस्ट उपक्रमात पुढील काही महिन्यांत नवीन गाड्या दाखल होतील. तोपर्यंत शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी आगारांतील जागा दिली गेली आहे. त्यानंतर नवीन बस दाखल झाल्यानंतर जागेची किती उपलब्धतता आहे ते पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली. 

वाहनांचा प्रकार               3 तासांपर्यंत    6 तासांपर्यंत   12 तासांपर्यंत

 • दुचाकी               20 रु.              25 रु.            30 रु.
 • तीन-चार चाकी    30 रु.              40 रु.            70 रु.
 • रिक्षा-टॅक्‍सी         30 रु.              40 रु.            70 रु.
 • ट्रक-टेम्पो           55 रु.              90 रु.            165 रु.
 • बस                    60 रु.              95 रु.            175 रु.

12 तासांपेक्षा जास्त तास      12 तास (मासिक)      24 तास (मासिक) 

 • 35 रु.                      660 रु.                    1320 रु. 
 • 80 रु.                      1540 रु.                  3080 रु. 
 • 80 रु.                      1540 रु.                  3080 रु. 
 • 205 रु.                    3630 रु.                  7260 रु. 
 • 215 रु.                    2000 रु.                  3700 रु. 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Park Your Vehicle In Best Bus Depot, Mumbai