पार्किंग प्लाझाचे स्वप्न अपूर्णच 

किशोर कोकणे
मंगळवार, 3 जुलै 2018

ठाणे -  ठाणे रेल्वेस्थानकात बनवण्यात येणाऱ्या दुमजली पार्किंग प्लाझाचे काम तीन वर्षांनंतरही रखडल्याने त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. रेल्वेस्थानकापर्यंत वाहने घेऊन येणाऱ्यांना पार्किंगची समस्या भेडसावत आहे. रेल्वे प्रशासनाने पार्किंगसाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील काही निधी मध्य रेल्वेने स्थानकातील इतर दुरुस्ती आणि विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे पार्किंग प्लाझा बनवण्यासाठी रेल्वेकडे निधीच शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

ठाणे -  ठाणे रेल्वेस्थानकात बनवण्यात येणाऱ्या दुमजली पार्किंग प्लाझाचे काम तीन वर्षांनंतरही रखडल्याने त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. रेल्वेस्थानकापर्यंत वाहने घेऊन येणाऱ्यांना पार्किंगची समस्या भेडसावत आहे. रेल्वे प्रशासनाने पार्किंगसाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील काही निधी मध्य रेल्वेने स्थानकातील इतर दुरुस्ती आणि विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे पार्किंग प्लाझा बनवण्यासाठी रेल्वेकडे निधीच शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

गेल्या वर्षभरापासून अर्धवट बांधण्यात आलेल्या अवस्थेत असलेल्या पार्किंग प्लाझाच्या तळघरात मध्य रेल्वेने वाहनतळासाठी जागाही दिली आहे. त्यामुळे पार्किंग प्लाझा दुमजली होणार की बांधकाम तसेच अपूर्ण राहणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

ठाणे रेल्वेस्थानकातून दिवसाला लाखो प्रवासी ये-जा करत असतात. शहरात वाहतुकीची पुरेशी सुविधा नसल्याने अनेक प्रवासी स्थानकात वाहने घेऊन येतात. त्यामुळे ठाणे स्थानकात त्यांच्या वाहनांसाठी प्रशस्त जागा असावी, अशी मागणी होत होती. त्यादृष्टीने रेल्वेने ठाणे स्थानकात दुमजली पार्किंग प्लाझा बांधण्याची घोषणा केली. जून 2015 ला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पार्किंग प्लाझाचे भूमिपूजनही झाले. त्यासाठी 17 कोटींचा निधीही मंजूर झाला होता; मात्र तीन वर्षे उलटूनही वाहनतळ अद्याप अपूर्णच आहे. पार्किंग प्लाझाचे तळघरच बांधणे मध्य रेल्वेला शक्‍य झाले आहे. वरील दोन मजले बांधण्यासाठी तळघरावर वीटही रचण्यात आलेली नाही. त्यामुळे पार्किग प्लाझाच्या ठिकाणी बांधकामासाठी लागणारी यंत्रे बंद पडलेली आहेत. सिमेंट-लोखंडी सळ्या असे बांधकामाचे साहित्यही पडून आहेत. रात्रीच्या वेळी अनेकदा तिथे मद्याच्या पार्ट्या चालतात. एप्रिलपासून पार्किंग प्लाझाच्या तळघरात रेल्वेने प्रवाशांसाठी पार्किंगही सुरू केले आहे. आमचे पैसेही प्रकल्पात अडकले असल्याचे एका ठेकेदाराने सांगितले. त्यामुळे बहुमजली पार्किंग प्लाझाचे ठाणेकरांचे स्वप्न केव्हा पूर्ण होईल त्याकडे प्रवाशांचे लक्ष आहे. 

असा आहे प्रकल्प 
पार्किंग प्लाझा प्रकल्प एकूण 1500 चौरस फूट आहे. प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने पार्किंग प्लाझा झाल्यास दोन हजार दुचाकी त्यात बसू शकतात. सध्या पार्किंग प्लाझाच्या तळमजल्यात रेल्वेकडून पार्किंग सुरू आहे. सकाळी 10 वाजताच हे वाहनतळ दुचाकींनी खचाखच भरून जाते. त्यात साधारणत: 600 पेक्षा जास्त दुचाकी पार्क होतात. पार्किंगसाठी प्रवाशांना जागा पुरत नाही. 

ठाण्यातील पार्किंग प्लाझाचे बांधकाम बंद अवस्थेत का आहे, याची चौकशी करून सांगतो. 
- ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी 

येथे झाला निधीचा खर्च 
पार्किंग प्लाझाच्या कामासाठी एकूण 17 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी रेल्वे प्रशासनाने पार्किंगच्या जागेवर असलेले पोलिस ठाणे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या कार्यालयाच्या इमारतीसाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचबरोबर कल्याणच्या दिशेने नव्याने बनविण्यात आलेल्या पादचारी पुलासाठी पाच कोटी रुपये तसेच सरकते जिने बनविण्यासाठी एक कोटी 45 लाख खर्च करण्यात आला असल्याची माहिती मुंबईतील एका रेल्वेच्या अधिकाऱ्याने खासगीत दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking Plaza dream is incomplete