पार्किंग धोरणावरून भाजपचे आमदार, नगरसेवक आमने-सामने 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - महापालिकेच्या बहुचर्चित पार्किंग धोरणावरून भाजपचे आमदार आणि नगरसेवक शुक्रवारी (ता. 7) आमने-सामने आले. भाजपचे कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांनी हे धोरण म्हणजे पार्किंगमाफिया पोसण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला. नगरसेवक ऍड्‌. मकरंद नार्वेकर यांनी हे धोरण लागू करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. 

कुलाब्यामध्ये 18 वाहनतळांवर चौपट शुल्कवाढ करत निवासी इमारतींसमोरील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांकडून मासिक शुल्क वसूल करण्याचे धोरण पालिकेने लागू केले आहे. हे धोरण यापूर्वीही लागू केले होते. त्यावर राज्य सरकारने स्थगिती मिळवली होती. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ही स्थगिती उठवल्यावर रविवारपासून पालिकेने हे धोरण पुन्हा राबविण्यास सुरुवात केली. त्यावर राज पुरोहित यांनी आक्षेप घेत, यातून पार्किंगमाफिया पोसले जाऊन कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होईल, असे सांगत त्यांनी धोरणाला विरोध केला. कोणतेही धोरण लागू करण्यापूर्वी नागरिकांना विश्‍वासात घेण्याची गरज होती. तसे न करता परस्पर हे धोरण लागू केल्याचा आरोप त्यांनी केला. 

भाजपच्या आमदारांनी या धोरणाला विरोध केला असला तरी कुलाबा येथील नगरसेवक ऍड्‌. मकरंद नार्वेकर यांनी या धोरणाचे समर्थन केले. सहायक आयुक्तांना पत्र पाठवून त्यांच्या प्रभागातील रहिवाशांनी या धोरणाला मान्यता दिली असून, लवकरात लवकर हे धोरण लागू करण्याची मागणी केली. एकाच पक्षातून दोन विरोधी भूमिका व्यक्त केल्या जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे भाजप आता या धोरणावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: parking policy issue