पोलिस कारवाईचा रुग्‍णांना ताप

पनवेल :  वाहनतळ अपुरे पडत असल्याने रुग्णालयाबाहेर परिसरात चालक वाहने पार्क करतात.  या वाहनांना पोलिसांनी जॅमर लावले आहे.
पनवेल : वाहनतळ अपुरे पडत असल्याने रुग्णालयाबाहेर परिसरात चालक वाहने पार्क करतात. या वाहनांना पोलिसांनी जॅमर लावले आहे.

पनवेल : कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील वाहनतळ अपुरे पडत असल्याने अनेकदा रुग्णांचे नातेवाईक बाहेरील आवारात वाहने पार्किंग करतात. मात्र वाहने नियमबाह्य पद्धतीने लावल्याचे कारण पुढे करत कळंबोली वाहतूक विभागाचे कर्मचारी दुचाकीवरून येऊन कारवाई करीत आहेत. त्‍यामुळे रुग्णांसह नातेवाईकांत संतापाचे वातावरण आहे.

सायन-पनवेल महामार्गावर कामोठे येथे एमजीएम हे नामांकित रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय; तसेच तंत्रज्ञान विषयाची महाविद्यालये असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची चारचाकी आणि दुचाकी वाहने येथे उभी असतात. येथेच रुग्णांचे नातेवाईकही वाहने पार्क करतात. त्यामुळे रुग्णालय आवारातील वाहनतळ अपुरे पडू लागल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात प्रशासनाने रुग्णालय आवारात वाहने उभी करण्यासाठी पैसे आकारण्यास सुरुवात केल्याने रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेरील पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. 

वाहनांवर कारवाई करताना प्रत्येक टोईंग व्हॅनसोबत पोलिस कर्मचारी असणे बंधनकारक आहे. कारवाईवेळी चालक तेथे उपस्थित असल्यास त्याला फक्त दंड भरावा लागतो; मात्र टोईंग शुल्क आकारले जात नाहीत. तसेच चालक गाडीजवळ असल्यास पोलिसांना तिथेच त्याचे वाहन सोडावे लागते.

टोईंग व्हॅनसोबत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यासोबत ई-चलन मशीन बाळगणे आता बंधनकारक आहे. मात्र कळंबोली वाहतूक पोलिसांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. वाहने नियमबाह्य पद्धतीने लावल्याचे कारण पुढे करत दुचाकीवरून येऊन कळंबोली वाहतूक विभागाचे कर्मचारी कारवाई करीत आहेत. रुग्णालयाबाहेरील वाहनांना जॅमर लावत असल्याने नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

औषध आणण्यासाठी उशीर 
एमजीएममध्ये रुग्णाच्या उपचारासाठी आवश्‍यक असलेले औषध आणण्याच्या सूचना डॉक्‍टरांनी केल्या होत्या. या वेळी हे औषध रुग्णालयातील औषधालयात नव्हते. त्यावेळी नातेवाईकांनी वाहनाकडे धाव घेतली असता त्यांना वाहनाला जॅमर बसविल्याचे लक्षात आले. वाहनाला लावलेले जॅमर काढण्यासाठी नातेवाईकांना कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागली. त्यामुळे औषध आणण्यासही उशीर झाला. वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा नाहक त्रास नातेवाईकांना सहन करावा लागला.

एमजीएम रुग्णालयाबाहेर वाहन उभी केली जात असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिकांना अडथळा होत असल्याच्या तक्रारी आल्‍या होत्‍या. त्‍यामुळे वाहतूक विभागाकडून जॅमर बसवण्याची कारवाई करण्यात आली आहे. जॅमरवरील क्रमांकावर संपर्क करताच कर्मचारी तेथे जाऊन तात्काळ दंड आकारून जॅमर काढून घेतात. 
- अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com