पारसिक डोंगर धोक्‍याच्या उंबरठ्यावर

किरण घरत
बुधवार, 31 जुलै 2019

ठाण्यातील कळवा-मुंब्रा येथील पारसिक डोंगर सध्या वाढत्या झोपड्यांनी ‘भकास’ झालेला दिसत आहे. अगदी डोंगरमाथ्यावर धोकादायक स्थितीत भूमाफियांनी झोपड्या उभारल्या असून, त्यांचा भार सोसवत नसल्यानेच दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारच्या (ता. ३०) आतकोनेश्वर येथील दरड दुर्घटनेने हा धोका अधोरेखित झाला.

ठाणे :  दोन दशकांपूर्वी रेल्वेतून येताना हिरव्यागार वनश्रीने आकर्षित करणारा ठाण्यातील कळवा-मुंब्रा येथील पारसिक डोंगर सध्या वाढत्या झोपड्यांनी ‘भकास’ झालेला दिसत आहे. अगदी डोंगरमाथ्यावर धोकादायक स्थितीत भूमाफियांनी झोपड्या उभारल्या असून, त्यांचा भार सोसवत नसल्यानेच दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारच्या (ता. ३०) आतकोनेश्वर येथील दरड दुर्घटनेने हा धोका अधोरेखित होत असून, हा पारसिक डोंगर जणू काही पुण्यातील ‘माळीण’च्या दुर्घटनेसारखी धोक्‍याची घंटा देत आहे. 

दोन दशकात मुंबई, ठाण्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाल्याने नोकरी व उद्योग-धंद्यासाठी परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे शहरात आले. ही संधी साधून येथील भूमाफियांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या सरकारच्या वन विभागाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर बेकायदा झोपड्या बांधल्या. वन विभाग व पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्या झोपड्या विकल्यानंतर त्यांवर कारवाईच न झाल्याने या डोंगरावर आतकोनेश्वर, पौंडपाडा, भास्करनगर अशी प्रचंड लोकसंख्या असलेली झोपडपट्टीची नगरे तयार झाली आहेत.  
 
पालिका व प्रशासनाचे भ्रष्ट अधिकारी, भूमाफिया, पाणीदलाल यांच्या कारनाम्यामुळे झोपड्या आता उंच डोंगरावरही पोहोचल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ओहळातून वाहून येणारे पाणी अडू लागले. डोंगरावरील माती व दगड मुसळधार पावसात खचण्याचा धोका असतो. भविष्यातील धोका ओळखून प्रशासनाने झोपड्या हटवल्या नाहीत, तर पुण्यातील ‘माळीण’ची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता आहे. 

‘सकाळ’नेही वेधले लक्ष
पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून पूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन अनेक कुटुंबे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर पारसिक डोंगरावरील अतिक्रमणांबाबत  ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त देऊन डोंगर खचण्याचा इशारा दिला; मात्र अद्यापही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अनधिकृत वीज व चोरीचे पाणी 
अनेक ठिकाणी महावितरणचे कर्मचारी व दलालांच्या संगनमताने विजेच्या खांबांवरून अनधिकृत मीटर दिल्याने झोपड्या वाढण्यास चालना मिळत आहे. महापालिकेच्या पाणी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे पाणी-दलालांशी असलेले साटेलोटे यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या मुख्य वाहिन्यांना छोट्या मोटर बसवून पाणी वरपर्यंत झोपड्यांना पोहोचवले जाते. त्यातून महिन्याला लाखो रुपयांची वसुली केली जाते. पारसिक परिसरात काही वर्षांत मोठ्या संख्येने मतदार नोंदणी झाल्याने हा परिसर राजकीय पुढाऱ्यांची ‘व्होट बॅंक’ ठरला आहे.

पारसिक भागातील २० झोपड्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे. आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, धडक कारवाईची मागणी केली आहे. त्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करणार आहोत.
- विजयकुमार जाधव, सहायक आयुक्त,
कळवा प्रभाग समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parsik Hill is in dangerous condition