उमेदवार मतदारराजाच्या दारात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ठाणे - रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधून सर्वपक्षीय उमेदवारांनी आपापल्या प्रभागात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पॅनेल पद्धतीने निवडणूक लढवायची असल्याने चारही उमेदवारांचे कार्यकर्ते एकत्रित प्रचार करत असल्याने ठाणे, उल्हासनगरमधल्या अनेक प्रभागांना जत्रेचे स्वरूप आले होते. शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांना आपल्या प्रभागात रॅली काढण्यासाठी उमेदवारांनी प्राधान्य दिले होते. 

ठाण्यात पॅनेल पद्धतीने पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. 33 प्रभागांमध्ये 131 जागांसाठी तब्बल 804 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे. रविवारचा मुहूर्त साधून शिवसेनेच्या प्रचारासाठी ठाण्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा "रोड शो' झाला; तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटप्रमुखांना मार्गदर्शन केले. सकाळी आठ वाजल्यापासूनच उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. पक्षाचे गाणे वाजवत प्रभागात रॅली काढली जात होती. घरोघरी पत्रके वाटण्यात आली. काही उमेदवारांनी दिवसभर आपल्या प्रचाराच्या रिक्षा प्रभागात फिरत्या ठेवल्या होत्या. महिला वर्ग आज मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाला होता. तरुण कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये भरणा होता. शहरात विविध राजकीय पक्षांचे झेंडे मिरवणारे अनेक सायकलस्वार प्रभागात फिरून आपल्या पक्षाचा प्रचार करत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत हा दमदार प्रचार करण्यात आला. त्यानंतर बहुसंख्य उमेदवारांनी मतदाराराजाची झोपमोड होऊ नये यासाठी गाणी वाजवणे बंद करून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून फेरी काढून मतदानाचे आवाहन केले. अनेक प्रभागांमधील कार्यकर्त्यांसाठी रविवारचा दिवस पाहून खास मांसाहारी जेवणाचा बेत होता. त्यातही बिर्याणी आणि मत्स्यहारी जेवणाला प्राधान्य होते. "ड्राय डे' रद्द झाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी दुपारीच आपला श्रमपरिहार केल्याचे पाहावयास मिळाले. 

Web Title: party rally