बेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

मुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा, टॅक्‍सी आणि खासगी वाहनांवर किमान १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावा लागला आहे. संपामुळे शेअर रिक्षा आणि टॅक्‍सीने येण्या-जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला दिवसाला किमान ६० रुपये अतिरिक्त मोजावे लागले आहेत. संपामुळे तीन दिवसांत बेस्टच्या महसुलाला ब्रेक लागल्याने सुमारे सहा कोटींचा तोटा झाला आहे.

मुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा, टॅक्‍सी आणि खासगी वाहनांवर किमान १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावा लागला आहे. संपामुळे शेअर रिक्षा आणि टॅक्‍सीने येण्या-जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला दिवसाला किमान ६० रुपये अतिरिक्त मोजावे लागले आहेत. संपामुळे तीन दिवसांत बेस्टच्या महसुलाला ब्रेक लागल्याने सुमारे सहा कोटींचा तोटा झाला आहे.

बेस्ट संपामुळे रिक्षा आणि टॅक्‍सीवाल्यांनी चांगलेच हात धुऊन घेतले. नेहमीचे शेअर रिक्षा-टॅक्‍सीवाले प्रत्येक फेरीमागे किमान पाच ते दहा रुपये जास्त आकारत आहेत. लांब पल्ल्याच्या शेअरिंगसाठी नेहमीपेक्षा २० ते ३० रुपये जास्त उकळले जात आहेत. विक्रोळीवरून दादरला जाण्यासाठी बसचे तिकीट २८ ते ३० रुपये आहे. शेअर टॅक्‍सीचे ४० रुपये होतात. पण सध्या त्यासाठी ६० ते ७० रुपये उकळले जात आहेत. ढोबळ हिशेब करायचाच झाला तर बेस्टच्या प्रत्येक प्रवाशाने दिवसाला किमान २० रुपये जादा खर्च केला आहे. बेस्टचे दररोजचे साधारण २५ लाख प्रवासी आहेत. प्रत्येकी २० रुपयांचा भुर्दंड मोजला तरी बेस्टच्या प्रवाशांचे तीन दिवसांत तब्बल १५ कोटी रुपये प्रवासावर अतिरिक्त खर्च झाले आहेत.

सलग सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांबरोबरच बेस्टलाही फटका बसला आहे. तीन दिवसांत बेस्टने किमान सहा कोटी रुपयांचा महसूल गमावला आहे.

१६ ऐवजी १५० रुपये
वडाळा ज्ञानेश्‍वर नगर ते वरळी सातरस्ता असा १६८ क्रमांकाच्या बसने मी रोज १६ रुपयांमध्ये प्रवास करतो; मात्र तीन दिवसांपासून त्याच प्रवासासाठी रोज टॅक्‍सीला कमीत कमी १०० ते १५० रुपये मोजावे लागत आहेत.

नोकरीपेक्षा प्रवास कठीण झाला आहे. आजवर बेस्टने दिलेली सेवा समाधानकारक आहे; मात्र संपामुळे बेस्ट प्रशासनाविरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे, अशी प्रतिक्रिया शिवडीतील रहिवासी संतोष कारंडे यांनी व्यक्त केली.

रोजचा खर्च ८० रुपये
माझे कपड्याचे दुकान आहे. रोज सकाळी मालवणी गेट क्र. ५ मधून दादरला कपडे खरेदी करण्यासाठी जाते. मालवणी ते मालाड बेस्ट बसने प्रवास करते. त्यासाठी १० रुपये लागतात; मात्र तीन दिवसांपासून शेअरिंग रिक्षाने जावे लागत असून एकेरी प्रवासासाठी ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. रिक्षासाठी दमछाक करावी लागते. काही कपडे विकून दोन पैसे मिळतात, त्यातील काही प्रवासात खर्च होत आहेत, असे यास्मिन मेमन म्हणाल्या.

आंदोलनाचा इशारा
मालाड - ८ जानेवारीपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच बेस्टविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी संघटनेने दिला आहे. संपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार मानून सम्यक विद्यार्थी संघटनेच्या वतीने १६ जानेवारी रोजी बेस्टविरुद्ध आंदोलन करू, असा इशारा मुंबई सचिव आकाश दोडके यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

नुकसान देणार का?
भांडुप ते गोरेगाव असा रोजचा बसने प्रवास करतो. १४०० रुपये बेस्टचा पास आहे. तीन दिवसांपासून बसच्या संपामुळे पास तर फुकट गेला, वर आर्थिक फटका बसला. त्याची भरपाई प्रशासन करणार का? आता लोकलचे तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. तोही दादरवरून. लोकलच्या गर्दीचा सामना करत कामावर जावे लागत आहे. रिक्षासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे, अशी कैफियत भांडुपचे प्रवासी भूषण मुळये यांनी मांडली.

दोनशे रुपये पाण्यात
मी देवनार पालिका वसाहत ते दादर प्लाझापर्यंत रोज बेस्टने प्रवास करतो. माझा बसचा मासिक पास १२०० रुपये आहे. खासगी नोकरीनिमित्त मला चेंबूर परिसरात दररोज फिरावे लागते. तीन दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने मी रिक्षानेच जात आहे. दररोज रिक्षासाठी सरासरी दोनशे रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. प्रवासाची दगदग होते ती वेगळीच, असे गोवंडीत राहणारे बेस्टचे प्रवासी संजीव वागळे यांनी सांगितले.

रोजच तीनशे रुपयांचा तोटा
मी दररोज धारावीहून कुर्ला नेहरूनगर शाळेत बसने प्रवास करते. तिकिटासाठी दोन्ही वेळचे मिळून ३० रुपये खर्च होतात; पण बसच्या संपामुळे दररोज टॅक्‍सी करावी लागत आहे. त्यासाठी किमान ३०० रुपये  
खर्च करावे लागत आहेत, अशी कैफियत धारावीतील शिक्षिका हिल्डा नाडार यांनी मांडली.

१२ ऐवजी ७० रुपये
मी धारावीहून वडाळ्यातील कार्यालयात जाण्यासाठी बेस्टचा आधार घेते; पण तीन दिवसांपासून सकाळी टॅक्‍सीही मिळत नसल्याने चालत जावे लागत आहे. १२ रुपयांच्या तिकिटात बसने कार्यालयात पोहोचत होते. तिथे मला आता ७० रुपये द्यावे लागत आहेत, असे वैशाली सावंत यांनी सांगितले.

अडीचशे रुपयांचा भुर्दंड
माझी नोकरी मार्केटिंग क्षेत्राशी निगडीत असल्याने दररोज चर्चगेट ते अंधेरीपर्यंत फिरावे लागते. दोन दिवस बसच्या संपामुळे टॅक्‍सी-रिक्षासाठी २०० ते २५० रुपये मोजावे लागले, असे दादरचे रहिवासी आशीष बिर्जे यांनी सांगितले.

आमचे आर्थिक नुकसान
मी अंधेरीला कामाला असल्याने दररोज वरळी ते दादर बसने प्रवास करतो. बसचे भाडे १० रुपये आहे; मात्र संपामुळे दोन दिवस कामावर जाण्या-येण्यासाठी टॅक्‍सीचे ७० रुपये रोज मोजावे लागले. संपामुळे नोकरदारांचे चांगलेच नुकसान झाले, असे वरळीतील रहिवासी विवेक कदम म्हणाले.

रिक्षामुळे खर्च वाढला
मी रोज मुलुंड ते मानखुर्द किंवा नेरूळ असा बेस्ट बसने प्रवास करतो. संपामुळे तीन दिवस मी मुलुंड ते घाटकोपर लोकलने प्रवास केला. घाटकोपरहून शेअर रिक्षाने शिवाजीनगर गोवंडीपर्यंत वीस रुपये खर्च होतात. शेअर रिक्षा उपलब्ध नसल्यामुळे मी मीटरच्या रिक्षाने प्रवास केला. तीन दिवसांत माझे अडीचशे ते तीनशे रुपये जादा खर्च झाले, अशी कैफियत मुलुंडचे प्रवासी संतोष सुर्वे यांनी मांडली.

Web Title: Passenger 15 Crore Loss by Best Strike