मुंबई विद्यापीठात पासिंग माफिया 

मुंबई विद्यापीठात पासिंग माफिया 

मुंबई - गैरव्यवहार आणि भोंगळ कारभारामुळे आधीच बदनाम झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आणखी एक गैरप्रकार उघड झाला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळत त्यांना उत्तीर्ण करणारे "पासिंग माफिया' विद्यापीठात सक्रिय आहेत. त्यात विद्यापीठातील कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यापैकी काहींवर विद्यापीठाने यापूर्वी फौजदारी कारवाईही केली आहे. मात्र चौकशीच्या फेऱ्यातून सुटलेले आजही कार्यरत आहेत. अभियांत्रिकी आणि विधी शाखेचा भाव सर्वाधिक आहे. या अभ्यासक्रमांच्या एका विषयात उत्तीर्ण करण्यासाठी 25 हजार रुपये घेतले जातात. प्रलंबित निकाल आणि गुणपत्रिका काढून देण्यास दीड ते दोन हजार रुपये घेतले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरवर्षी लाखो विद्यार्थी विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा देतात. उत्तरपत्रिका तपासणी, तसेच निकाल जाहीर करण्याचे काम विद्यापीठाच्या कालिना संकुलातील परीक्षा भवनातून चालते. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन मूल्यांकन पद्धतीमुळे निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत फारसा मानवी हस्तक्षेप नसतो. त्यामुळे निकालात फेरफार करणे कठीण बनले आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील "पासिंग माफियां'नी पुनर्मूल्यांकन, फोटो कॉपी, मार्कशीट तयार करणाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढत त्यांना उत्तीर्ण करण्याचे प्रलोभन दाखवले जाते. एका विषयात उत्तीर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून हजारो रुपये घेतले जातात. 

विद्यापीठात सुमारे 600 कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यापैकी 300 परीक्षा भवनात कार्यरत आहेत. अत्यल्प मानधन मिळत असल्याने त्यापैकी काही जण नियमित कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पैशांसाठी हे उद्योग करतात. 

दरम्यान, निकालासंबंधित काही कामांमध्ये आजही मानवी हस्तक्षेप असतो. या प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी विद्यापीठाने विशेष खबरदारी घेतल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे आमच्या कानावर आले आहे. या प्रकरणी कुलगुरूंकडे पाठपुरावा करण्यात येईल. 
- प्रदीप सावंत, सदस्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद. 

दरवर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 
- वाणिज्य शाखा - सुमारे 75 हजार 
- अभियांत्रिकी शाखा - 35 ते 40 हजार 
- विधी अभ्यासक्रम - 12 ते 13 हजार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com