पासपोर्ट कार्यालयाचे पुन्हा उद्घाटन!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

लोकसभा निवडणुका घोषित होण्याच्या पार्श्‍वभूमीवर घाईघाईत वाशीच्या पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाचे उद्‌घाटन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना शनिवारी पुन्हा एकदा कार्यालयाचे उद्‌घाटन करावे लागणार आहे.

नवी मुंबई - लोकसभा निवडणुका घोषित होण्याच्या पार्श्‍वभूमीवर घाईघाईत वाशीच्या पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाचे उद्‌घाटन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना शनिवारी पुन्हा एकदा कार्यालयाचे उद्‌घाटन करावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता घोषित करण्याच्या मुहुर्तावर खासदार राजन विचारे यांनी शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत याच कार्यालयाचा छोटेखानी कार्यक्रम उरकला होता; परंतु कार्यालयात मनुष्यबळ नेमणूक न केल्यामुळे हे कार्यालय फक्त शोभेपुरतेच ठरले होते. 

नवी मुंबईतील नागरिकांना पासपोर्टकरिता अनेकदा ठाणे अथवा वांद्रे कार्यालयात जावे लागत असल्याने नवी मुंबईतच पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत होती. भाजप सरकारच्या काळात तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नवी मुंबईकरांसाठी वाशी येथे पासपोर्ट कार्यालयाची घोषणा केल्यावर जणू काही श्रेय घेण्याची स्पर्धाच सुरू झाली होती. या कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी, उमेदवारांच्या अंगठ्याचे ठसे, डोळ्यांचे छाप आदी बाबी घेण्याकरिता आवश्‍यक यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. प्रतिदिवसाला ४० जणांचे कागदपत्र पडताळले जाणार आहे. 

केंद्र सरकारकडे पाठपुरावा
पासपोर्ट कार्यालयात मनुष्यबळ तैनात करण्यासाठी अखेर केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर आता या कार्यालयात ५ ते ६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passport office re-inauguration