पॅथॉलॉजिस्टची कमाई; रुग्णांना मात्र फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एकाच तज्ज्ञाने तयार केलेले वैद्यकीय तपासणी अहवाल विमा कंपन्यांकडून नाकारले जाण्याची शक्‍यता आहे, परंतु असे पॅथॉलॉजिस्ट ओळखण्याची यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांनाच फटका बसण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एकाच तज्ज्ञाने तयार केलेले वैद्यकीय तपासणी अहवाल विमा कंपन्यांकडून नाकारले जाण्याची शक्‍यता आहे, परंतु असे पॅथॉलॉजिस्ट ओळखण्याची यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांनाच फटका बसण्याची शक्‍यता आहे.

भारतीय वैद्यक परिषदेच्या नियमानुसार एक पॅथॉलॉजिस्ट एकाच प्रयोगशाळेत काम करू शकतो, परंतु काही पॅथॉलॉजिस्ट अनेक ठिकाणी काम करतात. अशा पॅथॉलॉजिस्टबाबत काही आरोग्य विमा (मेडिक्‍लेम) कंपन्यांनी आक्षेप घेतला आहे. नियमांनुसार वैद्यकीय तपासणी अहवाल तयार होताना पॅथॉलॉजिस्ट स्वत: उपस्थित असणे आवश्‍यक असते; मात्र अनेक वेळा त्याच्या हाताखालील कर्मचारी अहवाल तयार करतात आणि पॅथॉलॉजिस्ट फक्त स्वाक्षरी करतो. असे अहवाल वैद्यकीयदृष्ट्या ग्राह्य धरले जात नाहीत, असे बुलेट हेल्थ केअर या मेडिक्‍लेम दाव्यांची फेरतपसाणी करणाऱ्या कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंबई आणि पुण्यातील दोन पॅथॉलॉजिस्ट एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करत असल्याचे मेडिक्‍लेमची पडताळणी करत असताना बुलेट हेल्थ केअर या कंपनीच्या लक्षात आले. कंपनीने या दोघांशीही संपर्क साधला; मात्र वर्षभर प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांनी वेगवेगळ्या अहवालांवर आपल्याच स्वाक्षऱ्या असल्याचे मान्य केले. दोघांचीही नावे विमा कंपनीला दिली असून मेडिक्‍लेम रद्द करण्याची शिफारस केली आहे, असे बुलेट हेल्थ केअर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारे नियमबाह्य काम करणाऱ्या पॅथॉलॉजिस्टवर बंदी आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. तथापि, केंद्र सरकारकडून कारवाई होत नसल्यामुळे भविष्यात सामान्य नागरिकांना आणि रुग्णांनाच फटका बसण्याचीच शक्यता आहे.

सरकारने अशा प्रकारच्या बेकायदा पॅथॉलॉजी लॅब बंद कराव्यात. पॅथॉलॉजिस्टने आपल्या केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अनेक केंद्रांत केवळ स्वाक्षरी करण्यासाठी जाणाऱ्या पॅथॉलॉजिस्टना आमचा विरोध आहे. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे.
- डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्‍टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट

Web Title: Pathologist earnings patients loss in mumbai