esakal | मुंबईत १६८ रुग्णांना अचानक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये का हलवलं?

बोलून बातमी शोधा

oxygen
मुंबईत १६८ रुग्णांना अचानक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये का हलवलं?
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मागच्या आठवड्यात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचे वृत्त होते. पण प्रत्यक्षात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे, तर तांत्रिक बिघाडामुळे या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले आहे. लिक्विड मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, यासाठी चालू आठवड्यात महापालिका आणखी एका ऑक्सिजन पुरवठादाराशी करार करणार आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करताना, ऑक्सिजनची गरज लागतेय. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलेय.

सोमवारी रात्री मुंबईत ४३ आयसीयू बेड्स आणि २० वेंटिलेटर्स बेड्स शिल्लक राहिले होते. १७ एप्रिलला ऑक्सिजन कमतरतेमुळे महापालिकेने १६८ कोरोना रुग्णांना जम्बो कोविड केंद्र आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये हलवले.

मुंबईची दररोजची ऑक्सिजनची गरज २३५ मेट्रीक टन आहे. दोन पुरवठादारांकडून महापालिकेला इतका ऑक्सिजन पुरवला जातोय. यापुढे ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी तिसऱ्या पुरवठादाराशी लवकरच करार केला जाईल. "आधीपासून असलेले ऑक्सिजन सिलेंडर वेळेवर न भरल्यामुळे तीन दिवसांपूर्वी समस्या निर्माण झाली होती. सिलिंडर आधारीत ऑक्सिजन सिस्टिमची व्यवस्था तितकी उपयोगाची नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे. मुंबईत ऑक्सिजनची कमतरता होती म्हणून ही समस्या उदभवली असे नाहीय" असे काकानी यांनी सांगितले.

हेही वाचा: तन्मयच्या लसीकरणावरुन वाद, देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

ऑक्सिजन पुरवठादाराच्या उत्पादन प्रकल्पात तांत्रिक बिघाड उदभवला होता. त्यामुळे ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्याचे काकानी यांनी सांगितले. फेब्रुवारीच्या मध्यापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे. मुंबई महापालिका सिलिंडरमध्ये उपलब्ध असलेला ऑक्सिजन वापरते. मोठ्या प्रकल्पात हे ऑक्सिजन सिलिंडर भरले जातात. ऑक्सिजनची वाढती निकड लक्षात घेऊन मुंबई महापालिका स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा विचार करतेय.