जिल्हा रुग्णालय आवारात भटक्‍या कुत्र्यांमुळे रुग्णांमध्ये दहशत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

रुग्णालयात सुरक्षारक्षक व अन्य यंत्रणा असताना पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चढत काही भटके कुत्रे रात्रीच्यावेळी येतात.

मुंबई : येथील जिल्हा रुग्णालयातील समस्या वारंवार चर्चेत असताना रुग्णालयाच्या इमारतीमध्ये भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. रुग्ण प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. 
येथील रुग्णालय २५० खाटांचे आहे. हजारोच्या संख्येने रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत रुग्णालयात वर्दळ असते. त्यात काही जण ताप, थंडी, डायलेसिस, अपघात झालेल्या रुग्णांबरोबरच दात, डोळे व प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांचाही समावेश आहे. रुग्णांना पाहण्यासाठी त्यांचे नातेवाईक सतत येत असतात. त्यात काही रुग्णांचे नातेवाईक रुग्णांसोबत मदतीसाठी असतात; परंतु जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी राहण्याची सोय नसल्याने रुग्णालयाच्या इमारतीमध्येच मिळेल त्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक निवारा शोधत असतात. रुग्णालयाच्या तळमजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत रुग्णांचे नातेवाईक व्हरांड्यात राहतात. याच रुग्णांच्या नातेवाइकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे दिसून आले आहे. रुग्णालयात सुरक्षारक्षक व अन्य यंत्रणा असताना पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चढत काही भटके कुत्रे रात्रीच्यावेळी येतात. पाच-सहा कुत्र्यांचा या इमारतीमध्ये वावर गेल्या अनेक दिवसांपासून आहे; मात्र या कुत्र्यांनी चावा घेतल्यास मोठा अपघात होण्याची भीती रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त केला जात आहे. रुग्णांचे नातेवाईक व्हरांड्यात जीव मुठीत घेऊन राहत आहेत. रात्री-अपरात्रीवेळी कुत्र्यांनी इमारतीमध्ये धुमाकूळ घातल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोकाट कुत्र्यांचा वावर होत असल्यास संबंधित सुरक्षारक्षकांना रुग्ण नातेवाइकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना देण्यात येतील. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडे मागणी केली जाईल. 
- डॉ. अजित गवळी, 
जिल्हा शल्यचिकित्सक, 
जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients scaring to Street Dogs in District Hospital area