'पेटीएम गर्ल'चा पोर्नोग्राफीतून गंडा

अनिश पाटील
सोमवार, 8 एप्रिल 2019

मुंबई - इन्स्टाग्रामसह काही मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून "पेटीएम गर्ल'मार्फत लाइव्ह पोर्नोग्राफी सुरू असून, त्याद्वारे अनेकांची फसवणूक करत पैसे उकळले जात आहेत. मात्र, लज्जेपोटी पीडित व्यक्ती पोलिसांत तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई - इन्स्टाग्रामसह काही मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून "पेटीएम गर्ल'मार्फत लाइव्ह पोर्नोग्राफी सुरू असून, त्याद्वारे अनेकांची फसवणूक करत पैसे उकळले जात आहेत. मात्र, लज्जेपोटी पीडित व्यक्ती पोलिसांत तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

फसवणूक होणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण मोठे आहे. सध्या 20 हून अधिक ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून ही फसवणूक सुरू आहे. या ऍप्लिकेशन्सवर दोन हजारांपेक्षा अधिक प्रोफाइल्सद्वारे हा प्रकार सुरू आहे.

दोन हजारांहून अधिक प्रोफाइल व 20 हून अधिक अशा प्रकारची ऍप्लिकेशन्स सध्या सक्रिय आहेत. "पेटीएम गर्ल' या प्रोफाइल्सच्या माध्यमातून इन्स्टाग्रामसह काही ऍप्लिकेशन्सवर पैशांच्या बदल्यात युवतींचे लाइव्ह नग्न व्हिडिओ दाखवले जातात. पाच मिनिटांच्या या व्हिडिओसाठी पेटीएमच्या माध्यमातून पैसे उकळले जातात. शंभर रुपयांपासून हे व्हिडिओ उपलब्ध होतात. या युवतींना भेटण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तरुणांची फसवणूक करण्यात येते. सुरवातीला या तरुणांकडे पैशांची मागणी केली जाते. ती रक्कम भरल्यानंतरही विविध कारणे देत पुन्हा पैशांची मागणी केली जाते. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे या युवकांच्या लक्षात येते. काही वेळा बदनामीची धमकी देऊन खंडणीचीही मागणी केली जाते. मात्र, भीतीपोटी अशा व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.

या माध्यमातून फसवणूक करणारे संशयास्पद प्रोफाइल्स ब्लॉक करण्याच्या सूचना पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडून संबंधितांना दिल्या जातात. मात्र एक प्रोफाइल ब्लॉक झाल्यानंतर दुसऱ्या प्रोफाइलच्या माध्यमातून हा प्रकार सुरूच राहतो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पश्‍चिम उपनगरांतील 60 वर्षीय एका व्यक्तीचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाली होती. संबंधित युवतीला भेटण्यासाठी 40 हजार रुपये भरण्यास या व्यक्तीला सांगितले होते. मात्र, काही कालावधीतच आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मात्र, लज्जेपोटी त्याने पोलिस तक्रार नोंदवली नाही.

"पेटीएम गर्ल'च्या माध्यमातून सेक्‍सटॉर्शन ब्लॅकमेलिंग, फसवणूक असे प्रकार होऊ शकतात. असे करणारे पीडित व्यक्तीच्या मानसिकतेसोबत खेळतात, तसेच त्याला विविध प्रलोभने दाखवली जातात. पण मानसिकदृष्ट्या सक्षम राहून त्यास बळी न पडल्यास या प्रकारांना आळा घालता येऊ शकतो.'
- ऍड. विकी शहा, सायबरतज्ज्ञ

Web Title: paytm girl Pornography Cheating Crime