पास खिशात; अन् जीव मुठीत!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

बेलापूर - हार्बर रेल्वेमार्गावरील बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ पादचारी पूल असतानाही कमी वेळेत ऑफिसला जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी दररोज हजारो प्रवासी जीव धोक्‍यात घालून रेल्वेमार्गावरून ये-जा करतात. रेल्वेस्थानकाजवळच्या संरक्षक भिंतीची दुरवस्था झाल्यामुळे त्याचा गैरफायदा हे प्रवासी घेतात. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

बेलापूर - हार्बर रेल्वेमार्गावरील बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ पादचारी पूल असतानाही कमी वेळेत ऑफिसला जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी दररोज हजारो प्रवासी जीव धोक्‍यात घालून रेल्वेमार्गावरून ये-जा करतात. रेल्वेस्थानकाजवळच्या संरक्षक भिंतीची दुरवस्था झाल्यामुळे त्याचा गैरफायदा हे प्रवासी घेतात. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळी कामावर जाताना प्रत्येक मिनिटाचा हिशेब करणारे रेल्वेप्रवासी बेलापूर स्थानकाजवळ कार्यालयात जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून चक्क रेल्वेरुळावरून मार्गक्रमण करतात. सायंकाळी कामावरून सुटल्यावर घरी जाण्याची घाई असते म्हणूनही ते याच मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे येथे एखादा मोठा अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सीबीडी-बेलापूरमध्ये अनेक कंपन्यांची व बॅंका, सरकारी, निमसरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे येथे दररोज हजारो कर्मचाऱ्यांची ये-जा असते. त्यांच्यासाठी बेलापूर हे एकमेव आणि सोयीचे उपनगरी रेल्वेस्थानक आहे. सेक्‍टर ११ आणि १५ या ठिकाणी नोकरीसाठी येणारे नागरिक व बेलापूर, अग्रोळी आणि शहाबाज या गावांमधील नागरिक रेल्वेस्थानकात ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून दररोज ही जीवघेणी कसरत करतात. रेल्वे स्थानकाच्या पलीकडे जाण्यासाठीही हाच पर्याय अवलंबला जातो. 

बेलापूर स्थानकातून पनवेल, सीएसटी आणि ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलची नेहमी ये-जा सुरू असते. या मार्गावर वळण असल्याने बऱ्याचदा समोरून आलेली रेल्वे दिसत नाही. काही वेळा रुळावरून चालत असताना पाठीमागून लोकल येत असेल, तर ते कळत नाही. त्यामुळे येथे अनेकदा अपघात झाले आहेत. त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. काही कायमचे जायबंदी झाले आहेत. या रेल्वेरुळाशेजारची संरक्षण भिंत पडली आहे. वाहनांना पूर्व-पश्‍चिमेला ये-जा करण्यासाठी येथे उड्डाणपूल आहे. त्याच्या शेजारी पादचारी पूल आहे; परंतु या पादचारीपुलाचा नागरिक वापर करत नाहीत. तेव्हा हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वेने संरक्षक भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

कामावर जाण्याची किंवा कामावरून घरी परतण्याची प्रत्येकाला घाई असते. त्यामुळे नागरिक असे शॉर्टकट शोधून काढतात. रेल्वेरुळावरून चालणे धोकादायक असतानाही अनेक जण या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे अपघात होतात. रेल्वेने या ठिकाणी उंच आणि मजबूत संरक्षण भिंती बंधने गरजेचे आहे.
- सुरेंद्र पाटील, रेल्वे प्रवासी

Web Title: Pedestrian Pool near Belapur Railway Station