नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रोचं काम आलंय इथंपर्यंत...
नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रोचं काम आलंय इथंपर्यंत...

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रोचं काम आलंय इथंपर्यंत...

नवी मुंबई : तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवताना तसेच खारघरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार पडलेल्या जाहीर प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार असून जून अखेरपर्यंत मेट्रो धावेल असे आश्‍वासन दिले होते; मात्र सद्यस्थितीत ११ पैकी तीन स्थानकांचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याकरिता उत्सव चौक आणि केंद्रीय विहार स्थानकाचे काम लवकर पूर्ण करून मेट्रो सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

बेलापूर-पेंधर मार्गावर धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोचे तळोजा येथील कारशेडचे काम पूर्ण झाल्यामुळे कारशेड ते पेंधर मेट्रो स्थानकादरम्यान धावणाऱ्या मेट्रोला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. या कार्यक्रमादरम्यान सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फडणवीस यांना जून अखेरपर्यंत नवी मुंबई मेट्रो रुळावर धावेल असे आश्‍वासन दिले होते. हाच धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर प्रचार सभेत नवी मुंबई मेट्रोचा आवर्जून उल्लेख करत जूनपर्यंत मेट्रो धावणार असल्यामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते; मात्र बेलापूर ते पेंधरदरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या ११ स्थानकांपैकी बेलापूर, आरबीआय कॉलनी आणि बेलपाडा स्थानकाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. सिडकोकडून डिसेंबर-जानेवारी महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असल्याचे सांगितले होते; मात्र काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलू नये, अशी तंबी सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

रेल्वेचे काम करणाऱ्या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल पार्क ते पेंधर स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा, विद्युतीकरण आदी कामे झाली असून खारघर-बेलपाडादरम्यान रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि स्थानकावर सरकत्या जिन्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत मेट्रो रुळावर धावेल असे आश्‍वासन सिडको अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिल्यामुळे पंतप्रधानांनी जूनअखेर मेट्रो धावेल असे आश्‍वासन जाहीर सभेत दिले. हे आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी पेंधर ते बेलपाडादरम्यान मेट्रो जूनअखेरपर्यंत सुरू करण्यासाठी सिडकोकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तळोजा, खारघर परिसरातील प्रवासी नवी मुंबई मेट्रोने प्रवास करताना बेलापूरवरून मुंबई-ठाणे अथवा पनवेल प्रवास करणारे आहेत.

बेलापूर-पेंधर मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. दिलेल्या आश्‍वासनानुसार जून-जुलैपर्यंत बेलापूर ते पेंधरदरम्यान मेट्रो सुरू करण्याचा मनोदय आहे. त्या पद्धतीने काम सुरू आहे.
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com