पेंग्विन पाहण्यासाठी 100 रुपये घेण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

उद्धव ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतर शिवसेना-भाजपने फेटाळला प्रस्ताव

उद्धव ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतर शिवसेना-भाजपने फेटाळला प्रस्ताव
मुंबई - राणीच्या बागेतील पेंग्विनमुळे शिवसेना पुन्हा अडचणीत आली. पेंग्विन पाहण्यासाठी 100 रुपये आकारण्याच्या महापालिकेच्या निर्णयावरून शिवसेनेवर शनिवारी पुन्हा टीकेची झोड उठवण्यात आली. या विरोधामुळे गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेना-भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे तूर्तास अवघ्या पाच रुपयांत पर्यटकांना परदेशी पाहुणा पाहता येणार असला तरी महापालिका निवडणुकीनंतर हे शुल्क वाढवण्याची शक्‍यता आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आठ हॅमबोल्ट पेंग्विन ऑक्‍टोबरमध्ये आणण्यात आले. त्यातील एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यामुळे शिवसेनेवर जोरदार टीका झाली होती. हे प्रकरण सध्या लोकायुक्तांपर्यंत पोहचले आहे. या परिस्थितीत महापालिका निवडणुकीपूर्वी प्रशासनाने पेंग्विन पाहण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. यावरून सकाळपासूनच शिवसेनेवर टीका होत होती. वाद वाढू लागल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानुसार हा प्रस्ताव शिवसेना-भाजपने फेटाळून लावला.

दोन महिने येणारे पर्यटक व पेंग्विनच्या देखभालीवर होणारा खर्च याचा अंदाज घेऊन सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे आदेश गटनेत्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका संपल्यावर पेंग्विनचे दर्शन महागण्याची शक्‍यता आहे. एप्रिलमध्ये पालिका प्रशासन सुधारित प्रस्ताव सादर करणार आहे.

विद्यार्थ्यांसह पालकांना मोफत
जानेवारीच्या अखेरपर्यंत नागरिकांना पेंग्विन पाहता येतील. त्यानंतर दोन महिने 12 वर्षांखालील मुलांना पालक आणि शिक्षकांसह पेंग्विन मोफत बघता येतील. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने पेंग्विनगृहाचे उद्‌घाटन पालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सध्याचे दर - प्रस्तावित दर
- 12 वर्षांखालील मुलांसाठी दोन रुपये - 50 रुपये
- सर्वसामान्यांसाठी पाच रुपये - 100 रुपये

नितेश राणेंचा इशारा
पेंग्विनच्या मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही या संकल्पनेचे उद्‌घाटन होऊ देणार नाही, असे आव्हान कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने आणखी वाद टाळण्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या हस्ते पेंग्विन दर्शनचा श्रीगणेशा करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Penguin see opposition to Rs 100