आवाजाच्या फटाक्‍यांचा बार फुसका! 

आवाजाच्या फटाक्‍यांचा बार फुसका! 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या रात्री दोनच तास फटाके फोडण्याच्या निर्बंधाचे सकारात्मक परिणाम यंदाच्या दिवाळीत दिसून येत आहेत. 'सकाळ'बरोबरच सरकारी यंत्रणा आणि अन्य स्वयंसेवी संस्थांनी राबविलेल्या जनजागृती मोहिमेमुळे यंदा धूमधडाका करणाऱ्या फटाक्‍यांच्या विक्रीला फटका बसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फटाक्‍यांच्या दुष्परिणामांबाबत जाणीव वाढू लागल्याने गेली काही वर्षे त्यांची विक्रीही घटत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

मुंबईतील एक-दोन घाऊक फटाके व्यापाऱ्यांकडे तडाखेबंद विक्री झालीय; मात्र अनेक घाऊक व्यापारी दिवाळीपूर्वी एक-दोन दिवसांपर्यंत शांत बसून होते. दिवाळीच्या आदल्या दिवसापासूनच त्यांची विक्री सुरू झाली. वाढत्या जनजागृतीमुळे अनेक जणांनी फटाक्‍यांकडे पाठ फिरवली असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. 

यंदा शोभेचे फटाके घेण्याकडेच अनेकांचा कल होता. आवाजाच्या फटाक्‍यांना जास्त मागणी नव्हती, असे लालबागच्या जे. डब्ल्यू. खामकर फटाके दुकानाचे मालक संकेत खामकर यांनी सांगितले. हल्ली मोठ्या प्रमाणावर होत असलेली पर्यावरणविषयक जागृती त्याचे महत्त्वाचे कारण आहे, असेही त्यांनी दाखवून दिले. 

यंदा बाजारातच मंदी असल्याने आम्ही तणावाखाली होतो. एक तर फटाक्‍यांवर खर्च करण्याची सध्याची मानसिकता नाही. अनेकांकडे पैसेच नव्हते. पर्यावरणाबद्दलची जागरूकताही वाढू लागली आहे. आम्ही विकलेल्या फटाक्‍यांमधील जवळपास 80 टक्के आवाज न करणारे म्हणजेच शोभेचे होते. रविवारपासूनच खरा व्यवसाय झाला. घेतलेला सर्व माल संपला. एवढीही अपेक्षा नव्हती, असे मशीद बंदरमधील इसाभाई फायरवर्क्‍सचे अब्दुल्लाह घिया म्हणाले. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले असून, सप्तरंगी अनार, पाऊस, भुईचक्र, रॉकेट आदींसारखे कमीत कमी ध्वनिप्रदूषण करणारे फटाकेच विकले, असेही त्यांनी सांगितले. 

50 वर्षांहून अधिक काळ फटाकेविक्रीचा व्यवसाय करणारे एम. के. शाह दुकानाचे मालक प्रीतेश सुरेश शाह यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत हळूहळू फटाकेविक्रीत 25 टक्के घट झाली आहे. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. फटाक्‍यांच्या दुष्परिणामांबाबत झालेली जनजागृती, न्यायालयाचे आदेश आणि पर्यावरण रक्षणासाठी धडपडणाऱ्या संस्थांमुळे समाज जागरूक होत आहे. म्हणूनच फटाकेविक्रीत दिवसेंदिवस घट होत आहे. परिणामी, अनेक व्यावसायिक आपल्या पारंपरिक व्यवसायाला सोडचिट्ठी देण्याचा विचार करत आहेत. गेली काही वर्षे जास्त आवाजाचे फटाके अर्थात सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब आणि मोठ्या माळांची मागणी कमी होत चालली आहे. फुलबाजा, पाऊस आणि कमी आवाज करणाऱ्या शोभेच्या फटाक्‍यांनाच मागणी आहे. पूर्वी दिवाळीच्या महिनाभर आधीपासून फटाक्‍यांची विक्री होत होती; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी खरेदी सुरू होते. त्याचाही फटका फटाकेविक्रेत्यांना यंदा बसला. 

'सकाळ'चीही जागृती 
'सकाळ'नेही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने टेस्ट ड्राईव्ह घेत फटाक्‍यांचे दुष्परिणाम दाखवून दिले होते. फटाक्‍यांचा आवाज कसा घातक आहे, त्याची माहिती त्यातून देण्यात आली होती. तीन किंवा पाच हजारांच्या फटाक्‍यांच्या माळा ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ध्वनिप्रदूषण करतात, असे त्यात आढळून आले होते. साहजिकच मुंबईकरांनी आवाज करणारे फटाके घेण्यापेक्षा नुसती आतषबाजी करण्यावर भर दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com