संवेदना झाल्या बोथट!

शर्मिला वाळुंज
शनिवार, 5 मे 2018

ठाणे - ठाणे स्थानकात असलेल्या रेप-रोको स्वाक्षरी फलकावर काही नागरिकांनी पानाच्या पिचकाऱ्या मारण्यास सुरुवात केल्याने बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर त्याचा निषेध करणाऱ्यांच्या संवेदना बोथट झाल्याचे प्रतीत होत आहे.

ठाणे - ठाणे स्थानकात असलेल्या रेप-रोको स्वाक्षरी फलकावर काही नागरिकांनी पानाच्या पिचकाऱ्या मारण्यास सुरुवात केल्याने बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर त्याचा निषेध करणाऱ्यांच्या संवेदना बोथट झाल्याचे प्रतीत होत आहे.

कठुआ उन्नाव घटनेच्या निषेधार्थ एप्रिल महिन्यात एका राजकीय पक्षाने ठाणे रेल्वेस्थानक परिसरात रेप-रोको असा संदेश देत स्वाक्षरी मोहीम राबविली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध संदेश नोंदवत या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केल्याचा दिखावाच जणू केला होता. नागरिकांनीही या फलकांवर स्वाक्षरी करत या घटनांचा निषेध करून संवेदनशील नागरिक असल्याचा प्रत्यय दिला. हा कार्यक्रम झाल्यानंतर मात्र हा फलक काढण्याचेही सौजन्य कार्यकर्त्यांनी घेतले नसल्याने आता या फलकावर काही प्रवाशांनी पानाच्या पिचकाऱ्या मारल्या आहेत. मुळात कार्यक्रम झाल्यानंतर हा फलक हटविणे या राजकीय पक्षाची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तर रेल्वे प्रशासन किंवा ठाणे महापालिकेनेही हा फलक हटविण्याबाबतची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या राजकीय पक्षांच्या या अनास्थेकडे कोणीतरी लक्ष द्यावे, अशी भावना व्यक्त होत आहे. 

दरम्यान, याबाबत रेल्वे प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, येथे काही ना काही उपक्रम सतत राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जर कोणाचा फलक येथे राहिला असेल, तर त्याविषयी माहिती घेऊन तो हटविण्यात येईल, असे उत्तर दिले.

घटनांचे गांभीर्य नसल्याचा प्रत्यय
काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनांमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण होते. शहरा-शहरांत मोर्चे, कॅण्डल मार्च, सह्यांची मोहीम राबवून अशा प्रवृत्तींना कडक शासन करण्याची मागणी झाली होती. यामध्ये शहरातील काही राजकीय संघटनाही अग्रेसर होत्या. सर्वसामान्यांच्या संवेदनांवर स्वतःचे हित या राजकीय पक्षांनी साध्य केले; पण प्रसिद्धीचा हा खटाटोप संपल्यानंतर मात्र कोणालाही या घटनांचे गांभीर्य नसल्याचेच या प्रकारातून दिसत आहे. 

महिलांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम ठाणे रेल्वेस्थानक परिसरात घेण्यात आली. या वेळी नागरिकांनी स्वाक्षरी करत बलात्कारासारख्या घटनांचा निषेध करतो, असे मत नोंदविले होते; परंतु ज्यांनी ही मोहीम घेतली त्यांनाच त्याचे गांभीय नसल्याने लोकांच्या मताचाही आदर राखला गेला नाही. किमान आपण कोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम राबवितो आणि त्याविषयी आपली वर्तणूक कशी असावी, याचे भान राजकारण्यांनी बाळगणे गरजेचे आहे.
- अनिकेत वाघ, प्रवासी

एका राजकीय पक्षाने ही स्वाक्षरी मोहीम राबविली होती; मात्र जनतेच्या मतांचा राजकीय पक्षांनाच आदर नसेल तर जनतेनेही कोठेही स्वाक्षरी करून या कार्यक्रमांना पाठिंबा दर्शवावा का, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. रोजच्या धावपळीत नागरिकांच्या हे लक्षातही आले नसेल की त्यांनी स्वाक्षरी केलेला फलक येथेच आहे.
- दर्शना वायाळ, प्रवासी

Web Title: people start hitting the page on the Rap-Roko signature board at Thane station