मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पादचाऱ्यांचा वावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पादचारी, दुचाकीला बंदी असताना खालापूर हद्दीत राजरोसपणे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाहनचालकांना टोल भरूनही असुरक्षित प्रवास करावा लागत आहे.

खालापूर (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पादचारी, दुचाकीला बंदी असताना खालापूर हद्दीत राजरोसपणे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाहनचालकांना टोल भरूनही असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. देशातील पहिला सहापदरी द्रुतगती मार्ग तयार करताना जलद आणि सुरक्षित प्रवास हा उद्देश ठेवून मुंबई-पुणे द्रुतगती हा मार्ग बांधण्यात आला. मात्र, या मार्गावरील दुचाकी आणि पादचाऱ्यांच्या वावरामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कळंबोली ते देहू रोडपर्यंत रस्ता झाल्याने जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी झाला. ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर गेली १९ वर्षे आयआरबीकडे या मार्गाची टोलवसुली, दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. द्रुतगती मार्गावर कमीत कमी ८० वेगमर्यादेच भान ठेवून पादचारी, दुचाकी, तीनचाकी; तसेच बैलगाडी यांना बंदीचे धोरण सुरुवातीपासून आहे. परंतु, त्‍याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसून, खालापूर हद्दीत दुचाकी, भंगार गोळा करणारी मुले, प्रवासी यांचा मुक्त वावर होत आहे. या मार्गावर वर्षाला पाच ते सहा अपघात पादचाऱ्यांचे होत असून, वाहनांच्या वेगामुळे पादचारी जागीच ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रवाशांचाही वावर मोठ्या प्रमाणात असून, खाजगी बस, तसेच खासगी वाहतूक करणारे कारचालक प्रवासी घेताना मार्गावर धोकादायक पद्धतीने वाहन उभी करतात. खालापूर हद्दीत ज्या ठिकाणाहून प्रवासी, तसेच दुचाकीचा वावर आहे, त्या ठिकाणापासून अवघ्या २० फुटांवर वाहतूक पोलिस चौकी आहे. परंतु, रोज मरे त्याला कोण रडे याप्रमाणे दुर्लक्ष होत असून, यामुळे मात्र टोल देऊन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची सुरक्षितता मात्र धोक्‍यात आली आहे. प्रवाशांचा वावर धोकादायक असून, मार्ग ओलांडताना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्याने अपघात होतात. याशिवाय मनोरूग्ण, मोकाट गुरांचा वावरदेखील चिंतेचा विषय आहे. 

टोलनाका ते इसांबा फाटा, तसेच फूडमॉलपर्यंत अनेक दुचाकीस्वार शॉर्टकट म्हणून द्रुतगती मार्गाचा वापर करतात. परंतु, असा प्रवास धोकादायक असून त्यामुळे दुचाकींच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे आवश्‍यक आहे.
- आकाश धोत्रे, सावरोली, खालापूर

पाच महिन्यांसाठी ठेका मिळाला आहे. सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना करू.
- पी. सिंग, अभियंता, रोडवेज सोल्युशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples Roaming on Mumbai - Pune Express Highway