प्राण्यांचीही होणार सोनोग्राफी आणि एमआरआय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - मुंबईतील पाळीव प्राण्यांना येत्या सात ते आठ महिन्यांत अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. गंभीर आजार असलेल्या प्राण्यांच्या एमआरआय, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅनसारख्या चाचण्या करण्यासाठी यापुढे त्यांना मुंबईबाहेर नेण्याची गरज भासणार नाही. महालक्ष्मीतील महापालिकेच्या प्रस्तावित प्राण्यांच्या रुग्णालयातच सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

मुंबई महापालिकेचा प्राण्यांसाठी स्वतंत्र विभाग नव्हता. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पाळीव श्‍वानांचे परवाने आणि भटक्‍या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात होते; मात्र आता स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून त्याची जबाबदारी देवनार पशुवधगृहाचे महाव्यस्थापक डॉ. योगेश शेट्टे यांच्याकडे देण्यात आली आहे. पहिल्याच टप्प्यात पालिकेने प्राण्यांसाठी रुग्णालय बांधण्याबरोबरच उपनगरात त्यांच्याकरिता दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राण्यांचे रुग्णालय महालक्ष्मीमध्ये बांधण्यात येणार आहे. त्यासाठी विविध संस्थांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्याला काही संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांची पडताळणी करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे डॉ. योगेश शेट्टे यांनी सांगितले. महालक्ष्मीतील रुग्णालयात सर्व अत्याधुनिक सुविधा असतील. त्याचबरोबर सिटी स्कॅन, एमआरआय आणि अल्ट्रा सोनोग्राफीसारख्या अत्याधुनिक चाचण्याही केल्या जातील. भटक्‍या प्राण्यांसाठी सुविधा मोफत ठेवण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत अशा प्रकारचे हे पहिलेच रुग्णालय असेल, असेही त्यांनी नमूद केले. 

खारमध्ये संशोधन केंद्र 
पालिकेच्या महालक्ष्मीतील प्राण्यांच्या रुग्णालयाबरोबरच खारमध्ये संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यात प्राणिजन्य आजारांबाबत संशोधन करण्यात येणार आहे, असे डॉ. योगेश शेट्टे यांनी सांगितले. 

कोंडवाड्याचा विकास 
मालाडमध्ये महापालिकेचा कोंडावाडा आहे. त्या कोंडवाड्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यात मोठ्या भटक्‍या जनावरांना ठेवण्यात येईल. तिथेच दवाखानाही सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Pet animals Sonography and MRI in mumbai