डॉक्टरांच्या संपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्‍टरांच्या (मार्ड) संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल झाली आहे.

मुंबई : बुधवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्‍टरांच्या (मार्ड) संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल झाली आहे. संपकरी डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची मागणी याचिकादाराने केली आहे. याचिकेवर शुक्रवारी (ता. 9) सुनावणी होणार आहे. 

सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडवीया यांनी ऍड दत्ता माने यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे. हजारो रुग्णांना वेठीस धरुन मार्डचे डॉक्‍टर काम बंद आंदोलन करीत आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होत असून, गंभीर रुग्णांनाही उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने संप मागे घ्यावा आणि डॉक्‍टरांनी कामावर रुजू व्हावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.

तसेच संपाच्या पार्श्‍वभूमीवर मेस्मा कायद्यानुसार डॉक्‍टरांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.  मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा आज उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे. यापूर्वी मार्डने अनेकदा संप पुकारलेला आहे. याबाबत उच्च न्यायालयानेही अनेकवेळा निर्णय दिला आहे.

मार्डने सन 2013 आणि 2016 मध्ये न्यायालयात हमीपत्र दाखल केले, की यापुढे संप किंवा काम बंद आंदोलन करणार नाही. त्यामुळे या आदेशांचा भंगही संघटनेने केला आहे, असा दावा याचिकादारांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petition Filed in high court against Doctors Strike