विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे धडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

शाळेमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे फोटो काढण्याची संधी विद्यार्थ्यांनाच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबई : शालेय वयातच मुलांमध्ये फोटोग्राफीविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे धडे देण्यात येत आहेत. शाळेमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे फोटो काढण्याची संधी विद्यार्थ्यांनाच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

डी. एस. हायस्कूलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून एज्युकेशन फॉर क्रिएटिव्हिटी अंतर्गत चित्रपतंग कला संस्थेच्या माध्यमातून दृष्यकलेचे नियमित वर्ग घेतले जातात. याअंतर्गत नव्या शैक्षणिक वर्षात शाळेने छायाचित्रणकलेचाही समावेश केला आहे. इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा छायाचित्रणाचा अभ्यासवर्ग नियमितपणे घेतला जाणार आहेत. त्यात मोबाईल-स्मार्टफोन ते व्यावसायिक छायाचित्रणासाठी वापरला जाणारा अत्याधुनिक असा डीएसएलआर कॅमेरा कसा वापरावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जात आहे. विद्यार्थ्यांना पोर्ट्रेट, लॅंडस्केप, प्रोडक्‍ट फोटोग्राफीसोबत विविध प्रकारचे इव्हेंट टिपण्यासाठी लागणाऱ्या तंत्रांची ओळख करून दिली जाणार आहे.

शाळेमध्ये विविध कार्यक्रम होत असतात. याचे फोटो काढण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाईल, असे डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले. चित्रकला, हस्तकला यांसह फोटोग्राफीच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील तंत्रसाक्षरता आणि कलागुणांचा अधिक विकास होईल 
असे प्रधान यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photography lessons to students