अंधाऱ्या राती भुताखेतांची मला नाय भीती!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

विद्यार्थी भारती संघटनेने 31 जुलै गटारी आमवस्येच्या रात्री कल्याण पश्चिमेकडील बापगाव येथील स्मशानभूमीत सहलीचे आयोजन करून अंधश्रदेला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला.

कल्याण : अमावस्येची अंधारी रात्र! त्यात बापगाव स्मशानभूमीत काढलेली सहल! जवळच्या जंगलात एकट्याने जात आपला ‘टास्क’ पूर्ण करायचा अनोखा खेळ! निमित्त होते ते विद्यार्थी भारतीने आयोजित केलेल्या विशेष सहलीचे. गेली चार वर्ष यासाठी विद्यार्थी भारती प्रयत्न करत आहे. समाजात वावरताना घडत असलेल्या अनेक गोष्टीतून मनातील अंधश्रद्धा डोकं वर काढत असते. याच अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी या सहलीचे आयोजन केले होते.  

विद्यार्थी हितासाठी गेली १३ वर्ष काम करणाऱ्या या संघटनेने कल्याण पश्‍चिमेकडील बापगाव स्मशानभूमीत ३१ जुलैची रात्री साजरी केली. विद्यार्थ्यांसह काही पालक यावेळी उपस्थित होते. चमत्कार करून भोंदू बाबा भाबड्या जनतेला फसवतात. या चमत्कारांमागे असलेले विज्ञान विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने टीम परिवर्तनच्या स्वप्नील शिरसाट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यावेळी काही प्रयोग करून दाखवले. सहलीचे वातावरण रटाळ वाटू नये यासाठी विविध गाणी, अंधश्रद्धेवर आधारित पथनाट्यही सादर करण्यात आले. 

बिर्याणीवर मारला ताव
   सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांनी स्मशानात जाऊन गाणी म्हटली, वेगवेगळे खेळ खेळले, इतकेच नाही तर चक्क बिर्याणीवरही ताव मारला. रात्री उशिराने सुरू झालेली ही पिकनिक सूर्योदयापर्यंत सुरू होती अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करताना मनातील अंधश्रद्धा बाहेर फेकली  गेली. शिक्षणाला विज्ञानाची जोड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल हीच या संघटनेच्या यशाची पावती म्हणावी लागेल. या विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अंधश्रद्धा दूर करत समाजातूनही तिला हद्दपार करणे हे आपले कर्तव्य असल्याचे भावही त्यांच्या मनात निर्माण झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Picnic in Smashan Bhumi on Occasion of Amavasya