हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकाचा मृत्यू

हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकाचा मृत्यू

आरे कॉलनीच्या जंगलात दुर्घटना; तिघे जखमी

मुंबई- पर्यटकांना मुंबई दर्शन घडवणारे चार आसनी हेलिकॉप्टर आरे कॉलनीच्या जंगलात कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. 11) दुपारी 12.15च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात हेलिकॉप्टरमधील दोन प्रवासी आणि एक तंत्रज्ञ जखमी झाला. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. कालबाह्य हेलिकॉप्टरमुळे ही दुर्घटना घडली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अमन एव्हिएशनच्या "आर 444' श्रेणीतील या हेलिकॉप्टरने दुपारी 12च्या सुमारास जुहू येथील पवन हंस या छोट्या विमानतळावरून उड्डाण केले. त्यात पायलट, तंत्रज्ञ व दोन प्रवासी होते. जुहू ते पवई विहार लेक, फिल्मसिटी व तेथून परतीचा मार्ग होता. दुपारी 12.15च्या सुमारास हेलिकॉप्टर फिल्मसिटी परिसरात (आरे फिल्टरपाडा) आल्यावर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने हेलिकॉप्टर रॉयल पाम परिसरात उतरवण्याचा प्रयत्न केला; मात्र बिघाडामुळे ते हेलकावे खाऊ लागले, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर लॅण्ड करताना झाडाची फांदी लागल्याने त्याचे संतुलन बिघडले आणि ते जमिनीवर आपटले. या दुर्घटनेत त्याचा अक्षरशः चक्काचूर झाला. इंधनाच्या टाकीला आग लागल्याने हेलिकॉप्टरने क्षणात पेट घेतला आणि चौघेही आगीत अडकून पडले.

सुदैवाने परिसरात लोकवस्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली. परिसरातील नागरिकांना अशा हेलिकॉप्टरच्या नेहमीच्या फेऱ्या माहीत होत्या; मात्र हे हेलिकॉप्टर हेलकावे घेत कोसळत असल्याचे दिसल्याने स्थानिकांनाही शंका आली. हेलिकॉप्टर कोसळल्याचे पाहून त्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून प्रवाशांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न स्थानिकांनी केला. याचदरम्यान काहींनी अग्निशमन दल आणि पोलिसांना दुर्घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे दोन बंब तत्काळ तेथे दाखल झाले. आग विझवल्यानंतर जखमींना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र पायलट प्रफुल्ल मिश्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने आणि भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक राज करवा यांनी दिली.

विमानात रितेश मोदी (वय 35) आणि बिंद्रा मोदी (32) या प्रवाशांसह तंत्रज्ञ-मदतनीस संजय शंकर होते. तिघेही जखमी झाले आहेत. बिंद्रा 35 टक्के भाजल्या आहेत, तर संजय किरकोळ जखमी झाले. मिश्रा वायू दलातील निवृत्त वैमानिक होते. अमन एव्हिएशनने हे विमान पवन हंसकडून विकत घेतले होते; मात्र ते जीर्ण झाले होते, असा दावाही तज्ज्ञांकडून केला जात आहे.

या दुर्घटनेची आरे पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. प्राथमिक तपास सुरू केला आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाचा अहवाल आल्यावर यासंदर्भात नेमका दोष कोणाचा, याची माहिती मिळेल. त्यानुसार कारवाई केली जाईल.
- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त.

दुर्घटनेतील हेलिकॉप्टर जुन्या तंत्राचे होते. पवन हंस कंपनीने ते 15 वर्षांपूर्वी सेवेतून बाद केले होते. लिलावात ते विकले गेले होते. जगात कोठेही या तंत्रज्ञानाची हेलिकॉप्टर वापरली जात नसताना याच्या उड्डाणास केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने कोणत्या आधारे परवानगी दिली, त्याची तपासणी केली पाहिजे. प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ आहे.
- विपुल सक्‍सेना, हवाई तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com