अंगणवाडी भरते चक्क सेविकेच्या घरी.. असे काय झालं...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

कर्जत तालुक्‍यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील पिंपळपाडा येथील अंगणवाडी इमारतीची अवस्था दयनीय असून, इमारत धोकादायक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे जुलै २०१९ पासून अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांची शाळा अंगणवाडीसेविकेच्या घरी भरवली जात आहे.

नेरळ (बातमीदार) : कर्जत तालुक्‍यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील पिंपळपाडा येथील अंगणवाडी इमारतीची अवस्था दयनीय असून, इमारत धोकादायक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे जुलै २०१९ पासून अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांची शाळा अंगणवाडीसेविकेच्या घरी भरवली जात आहे. तेथे ही बालके पोषण आहार खाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ येथील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

रायगड जिल्हा परिषदेतर्फे सुमारे सहा लाख रुपये खर्चून मोग्रज ग्रामपंचायतमधील पिंपळपाडा येथे २०१६-१७ मध्ये अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले; मात्र या कामाचा दर्जा चांगला नसल्याने काही दिवसांतच अंगणवाडी इमारतीच्या भिंतींना अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेले. याशिवाय, अंगणवाडी इमारतीच्या पायाचे कामही नित्कृष्ट दर्जाचे असल्याने जोत्याचे बांधकाम खचले आहे. तसेच, इमारतीच्‍या पत्र्‍यांखालील लावलेले लोखंडी पाइप काही ठिकाणी अर्धवट तुटल्‍यामुळे ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अल्पावधीतच अंगणवाडीची इमारत धोकादायक झाली आहे.

...आणि समोरून धडधडत आला मृत्‍यू, बातमी वाचाल तर डोळ्यातून पाणी येईल

इमारतीच्या अशा दयनीय अवस्थेमुळे ग्रामस्थांनी अंगणवाडी इतरत्र भरवण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविकेच्या भरवली जात असून तेथे बालकांना शिक्षण दिले जात आहे. पोषण आहार देण्याचे काम अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांच्याकडून केले जात आहे. त्या इमारतीबाबत स्थानिकांनी मोग्रज ग्रामपंचायतच्या माध्यमातून कर्जत येथील एकात्मिक बालकल्याण विभागाला कळवले आहे. परंतु, या विभागाकडून त्या इमारतीबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान, पिंपळपाडा येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक झाली असून, त्याकडे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याअगोदर या अंगणवाडी इमारतीचे काम नव्याने करण्यात यावे, अशी मागणी तुकाराम बांगारे, तुळशीराम बांगारे, हनुमंत केवारी, सखाराम बांगारे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

नवी मुंबईतील मातब्बर नेत्यांना झटका; वाचा नक्की काय झालं!

रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि महिला बालकल्याण विभाग निधी देईल आणि त्यानंतर कर्जत पंचायत समिती कार्यवाही करेल. यावर अवलंबून न राहता आदिवासी विकास विभागाने अंगणवाडी इमारतीसाठी निधी द्यावा.
- भरत शीद, अध्यक्ष आदिवासी संघटना, कर्जत तालुका

कर्जत पंचायत समितीकडे आम्ही पिंपळपाडामधील नादुरुस्त झालेल्या अंगणवाडी बाबत दुरुस्तीसाठी निधी मागितला आहे. त्याचवेळी रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडेही निधी मिळावा, यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
- विलास भला, उपसरपंच, मोग्रज ग्रामपंचायत

पिंपळपाडा येथे बांधलेली अंगणवाडीची इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन अंगणवाडी बांधकामाची पाहणी करून आवश्‍यकता असल्यास लवकरच अंगणवाडी सुस्थितीत केली जाईल.
- सुरेखा हरपुडे, सदस्य, पंचायत समिती कर्जत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpalpada Anganwadi under danger condition... Servant takes lesson to her house