सायन-पनवेल महामार्गावर खड्डे दुरुस्तीचे काम

सायन-पनवेल महामार्गावर खड्डे दुरुस्तीचे काम
सायन-पनवेल महामार्गावर खड्डे दुरुस्तीचे काम

नवी मुंबई : पावसामुळे खराब झालेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जात आहेत. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा मिळणार असून, येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍नही सुटण्यास मदत होणार आहे. 

सायन-पनवेल महामार्गावरून दररोज हजारो वाहने व पाच लाखांपेक्षा अधिक प्रवासी ये-जा करतात. या महामार्गावर सानपाडा, नेरूळ, उरण फाटा, कामोठे आणि खारघर अशा पाच ठिकाणी उड्डाणपूल आहेत. संततधार पावसामुळे या उड्डाणपुलांवर व महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक अपघात झाले होते. त्यात युवक कॉंग्रेसने आचारसंहितेपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी, यासाठी वाहनचालकांना रोज कराव्या लागणाऱ्या खड्डयातील प्रवासातून होणाऱ्या पाठदुखीवर औषध म्हणून वेदनारहित बामचे वाटप करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पहिल्याच पावसात या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्यासाठी पावसाने उसंतच दिली नसल्याने नोव्हेंबर महिना सुरू होताच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याजवळचे खड्डे खडी व अन्य मटेरियल टाकून बुजवले जात आहेत. पावसाळ्यात महामार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काही दिवसांपासून तुर्भे पोलिस ठाण्यासमोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे. तुर्भे ते जुईनगरदरम्यानचा रस्ता अतिशय खराब झाल्याने त्याचा वाहनचालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

गेल्या पाच महिन्यांपासून सलग पडलेल्या पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे; परंतु आता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. 

पाऊस सुरू असताना खड्डे बुजवण्यात अडचणी येतात. मात्र, आता पावसाने एक्‍झिट घेतल्याने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होईल. 
- किशोर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य कार्यकारी अभियंता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com